|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » पं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार प्रदान

पं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार प्रदान 

पुणे/ प्रतिनिधी: 

अमूल्यज्योति केशववेणू फाऊंडेशन वतीने दरवषी देण्यात येणारा पं. पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार यावषी सुप्रसिद्ध बासरीवादक पं. अमरनाथ यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे सलग चौथे वर्ष असून मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे आकाशवाणीचे संचालक गोपाळ अवटी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध बासरीवादक पं. केशव गिंडे, दीपक भानुसे हे देखील यावेळी उपस्थित होते.

भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य समजल्या जाणाऱया बासरीला भारतीय गायकीच्या जवळ नेणाऱया आणि बासरी या वाद्यात अनेक सुधारणा करणाऱया पं. पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील अमूल्यज्योती आणि केशववेणू फाऊंडेशन यांच्या वतीने अमूल्यज्योती केशववेणू संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार पं. अमरनाथ यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान ऋतूचक्रया संकल्पनेनेवर ज्ये÷ बासरीवादक डॉ. पं. केशव गिंडे यांनी बासरीवादन केले. ज्यामध्ये सहा ऋतूतील बारा रागावर 13 बासरीवादकांनी सादरीकरण केले. पं. गिंडे, पं. राजेंद्र कुलकर्णी यांबरोबर बासरी वादकांनी सादर केलेल्या या बारा रागांमुळे सभागृहातील उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले होते. यामध्ये मुख्यतः बसंत ऋतुतील राग बसंत बहार, राग गारा, ग्रीष्म ऋतुतील राग वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग, वर्षा ऋतुतील राग मेघ, राग मेघ मल्हार, मियां मल्हार, शरद ऋतूतील राग मालकंस, हेमंत ऋतुतील राग जोग कंस, राग पहाडी आणि शिशिर ऋतुतील राग श्री आणि राग भैरव यांचे सादरीकरण झाले. यावेळी अतुल कांबळे (तबला), गोविंद भिलारे (पखावज) आणि अमन वरखेडकर व आदित्य पवार (की बोर्ड) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर दिल्लीचे डॉ. पं. निशिंद्र किंजल्क यांचे सतारवादन झाले. त्यांनी सतारीवर राग यमन वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पं अरविंदकुमार आझाद यांनी साथसंगत केली. महोत्सवाचा समारोप प्रख्यात बासरी वादक पं.पारस नाथ यांच्या बासरीवादनाने झाला. त्यांनी राग मधुवंती सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना साथसंगत केली.

याबरोबरच जोहन पिन्यारिओ या फ्रान्सच्या विद्यार्थ्यांला अमर गोगटे तबला शिष्यवृत्ती फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. पं. पन्नालाल घोष यांनी वाजविलेल्या भैरवीची ध्वनीफीत ऐकवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related posts: