|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » चित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन

चित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन 

 

‡ पुणे / प्रतिनिधी

एकाचवेळी आपल्या विविध कौशल्यातून व्यक्त होणाऱया पुलंनी नाटक आणि चित्रपट या माध्यमातूनही रसिकांना भुरळ घातली. चित्रपट आणि नाटकातील अभिनेता, संवादक, संगीत दिग्दर्शक, गायक अशा विविध भूमिकांमधून पुलंच्या बहुरूपी व्यकितत्वाचेच दर्शन झाले अशी भावना मान्यवरांनी आज आयोजित परिसंवादात व्यक्त केली.

पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक च्या वतीने आणि स्क्वेअर 1’च्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवानिमित्त येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘चित्रपट नाटकातील पु. ल.’ या परिसंवादात माधव वझे, आनंद माडगूळकर, आणि किरण यज्ञोपवीत सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

आनंद माडगुळकर म्हणाले की, समजून घेणारे, वेव्हलेन जुळणारे सहकारी असतील तर काम चांगले होते. तीव्र दुःख आवेग किंवा अति आनंद अशी कोणतीही भावना असली तरी पुलंचा अभिनय हा कधीच अंगावर यायचा नाही. तुम्ही पात्राशी जसजसे एकरुप होतात, तसतसा तुमचा अभिनय नैसर्गिक होतो, यावर पुलंचा विश्वास होता. मराठी चित्रपट सृष्टीत मानधन मिळण्याबाबत होणाऱया विलंबामुळे पुलं चित्रपट सृष्टीत फार काळ रुळले नाहीत. पुल किंवा गदिमा असो या मंडळींचे कधी स्वतःचे मानधन मागण्याचे धाडसच झाले नाही. पैसे बुडविणे हे प्रकार त्याही काळात होत होते. ही वृत्ती म्हणजे चित्रपट सृष्टीला लाभलेला शाप आहे. अनेकदा गुणवान कलाकारांना देखील चित्रपट सृष्टीतील अनिश्चितीमुळे नको ते काम स्विकारावे लागते आणि ते करावे लागते.

माधव वझे म्हणाले की, 1948 ते 1952 या चार वर्षांच्या काळात पुलंनी 19 चित्रपट काढले आणि सर्व चित्रपट हिट झाले. लोकांच्या पसंतीस पडले. लेखकाच्या दृष्टीस योग्य दिग्दर्शक मिळाला नाही, तर त्या कलाकृतीची माती होते, असा पुलंचा अनुभव होता. ’तीन पैशांचा तमाशा’बाबतीत पुलंना हाच अनुभव आला. पुलंना तमाशाच्या अंगाने जाणारे नाटक अपेक्षित होते. मात्र, ते नाटकाची रंगीततालीम पाहिला गेले असता नंदू भेंडे, भास्कर चंदावरकर आणि आनंद मोडक या तिघांवर असलेला पाश्यात्य संगीताच्या प्रभावामुळे त्या नाटकावर पाश्यात्य संगीताचा प्रभाव पडला. त्यावेळी या पाश्चात्य संगीताच्याप्रभावा पोटी त्या नाटकाला लाभलेले कर्कश संगीतामुळे कानात कापसाचे बोळे घालून घ्यावेत, अशी प्रतिक्रिया पुलंनी वसंतराव देशपांडे यांच्याकडे दिली होती.

किरण यज्ञोपवित म्हणाले की, ‘सबकुच पुल’ या तत्तावाने कथा, पटकथा, संगीत दिग्दर्शन सर्वच निर्मीतीशी संबंधीत सर्वत जबाबदाऱया पुलंनी पार पाडल्याने पुलं चाहत्यांना ’वंदे मातारम’ सारख्या चित्रपटांचा आस्वाद घेता आला.