|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » पुणे मॅरेथॉन 2 डिसेंबरला रंगणार

पुणे मॅरेथॉन 2 डिसेंबरला रंगणार 

पुणे / प्रतिनिधी :

33 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 2 डिसेंबरला होणार असून, यंदा स्पर्धा ट्रफिकमुळे अर्धा तास आधी म्हणजे 5 वाजता सुरू होणार आहे. तसेच 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा यंदा महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचा यात समावेश करण्यात आला आहे. ज्या खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव उंचावणारी कामगिरी केली आहे, असे पाच आदर्श खेळाडू या स्पर्धेसाठी बँड ऍम्बेसेडर म्हणून काम करणार असल्याची माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे ऍड. अभय छाजेड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

33 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, स्पर्धा सहसंचालक रोहन मोरे, गुरबनस कौर आदी उपस्थित होते. छाजेड म्हणाले, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन समितीच्यावतीने ऐम्स या संस्थेने अधिकृत केलेला पुरुष आणि महिला पूर्ण मॅरेथॉन 42.195 किलोमीटर, पुरूष व महिला अर्धमॅरेथॉन 21.975 किलोमीटर तसेच 10 किलोमीटर पुरूष-महिला 10 किलोमीटर तसेच शालेय वयोगटातील 14 आणि 16 वर्षांखालील मुलांसाठीचा मार्ग ठरविण्यात आला आहे. याचे मान्यता प्रमाणपत्रदेखील मिळाले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची मान्यता एएफआय नवी दिल्ली यांच्याकडून मिळाली आहे.

या स्पर्धेसाठी एकूण 1 हजार स्वयंसेवक कार्यरत असून, 150 तांत्रिक अधिकारी काम करत आहेत. डॉ. पराग संचेती आणि डॉ. राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 400 डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात येईल. यात डॉक्टर, फिजिओथेरिपिस्ट आणि नर्सेस हे सुरूवातीपासून स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर कार्यरत असतील. आत्तापर्यंत 100 परदेशी खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला असून, 225 प्रवेशिका आल्या आहेत. पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेसाठी 15 परदेशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. भारतीय गटात आत्तापर्यंत 3500 प्रवेशिका आल्या आहेत. त्यात मुख्यत्वे आर्मी स्पोर्टस् इन्स्टिटय़ूटच्या खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. मॅरेथॉनमॅन प्रल्हाद सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृती रनचे आयोजन करण्यात आले आहे, असे छाजेड यांनी नमूद केले. मागील मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाची रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले होते. यावरून बराच वाद झाला होता. याबाबत बोलताना छाजेड म्हणाले, मागील वषीच्या सर्व विजेत्यांना पारितोषिके दिली आहेत. यंदाच्या स्पर्धेची पारितोषिक थोडय़ाच दिवसांत जाहीर करण्यात येतील. यंदा पूर्णमॅरेथॉन स्पर्धेत अडीच तासांत 21 किलोमीटरचा टप्पा जो पूर्ण करेल, तोच पुढे 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरेल. यंदा स्पर्धेच्या मार्गातदेखील बदल करण्यात आला असून, कृषी महाविद्यालयाचा भाग वगळण्यात आला आहे. तसेच स्पर्धेचा प्रारंभ सणस पुतळ्यापासून होईल.

Related posts: