|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाकीट चोरटा पोलिसांच्या ताब्यात

पाकीट चोरटा पोलिसांच्या ताब्यात 

कणकवली रेल्वे पोलिसांची कारवाई

वार्ताहर / कणकवली:

कणकवलीहून डिचोलीगोवा येथे जनशताब्दी एक्प्रेसने जाण्यासाठी रेल्वेत चढत असताना विष्णूदास शिवा परब (46, डिचोलीगोवा) यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट चोरल्याची घटना सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. 1 वर घडली. त्यानंतर परब यांनी तातडीने रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित समीर कासम कलोट (24,पाचलराजापूर) याला रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील शेडमध्ये ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत विष्णूदास शिवा परब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते गोवा येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी वैष्णवी यांना तपासणीसाठी घेऊन ते कणकवलीत आले होते. त्यानंतर दुपारी 12.20 च्या जनशताब्दी एक्प्रेसच्या जनरल डब्यातून ते डिचोलीत जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर आले. 12.30 च्या सुमारास ते जनशताब्दी एक्प्रेसमध्ये चढत असताना विष्णूदास यांच्या पॅन्टच्या खिशात कुणीतरी हात घालत असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यावेळी त्यांनी मागे पाहिले असता पांढऱया रंगाचे चेक्सचे फूल शर्ट असलेला तरुण रेल्वेत न चढता मागे निघून गेल्याचे निदर्शनास आले. विष्णूदास यांनी खिशात पाकीट तपासले असता ते चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या तरुणाने पाकीट चोरल्याचे लक्षात आल्याने विष्णूदास यांनी त्या रेल्वेने डिचोलीला न जाता रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱयांना माहिती दिली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडला

त्यांच्या पाकिटात 500 रुपये, अमेरिकन चलनातील 355 रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची दोन डेबिट कार्ड अशी रक्कम व वस्तू चोरीस गेल्याचे परब यांनी रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणले. या दरम्यान जनशताब्दी एक्प्रेस मडगावच्या दिशेने रवाना झाली. रेल्वे पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर वर्णनाचा तरुण रेल्वेस्थानक भागात प्लॅटफॉर्मवरील शेडमध्ये बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडे सदर पाकीट मुद्देमालासह आढळले. त्याला ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहाय्यक उपनिरीक्षक अरुण लोट व कॉन्स्टेबल अर्चना कोचरेकर यांनी केली. संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.