|Thursday, May 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम 

प्रतिनिधी/ बेंगळूर

ऊस बिलांची थकबाकी तसेच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देऊन बेंगळुरमधील शेतकऱयांनी आपले आंदोलन सोमवारी सायंकाळी मागे घेतले. ऊस थकबाकीसंबंधी सरकारने ठोस पाऊल न उचलल्याने राज्यातील विविध भागातून आलेल्या शेतकऱयांनी सोमवारी सकाळी विधानसौधला घेराव घालण्यासाठी बेंगळूरच्या रेल्वे स्थानकावरून मोर्चा काढला. बेमुदत आंदोलन छेडण्यासाठी जमलेल्या शेतकऱयांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

उसाची थकबाकी देण्यासंबंधी, शेतकऱयांचे कृषीकर्ज माफ यासह अनेक मागण्या समोर ठेऊन शेतकऱयांनी चलो विधानसौध आणि बेमुदत आंदोलन हाती घेतले होते. विधानसौधला घेराव घालण्यास निघालेल्या शेतकऱयांना पोलिसांनी फ्रिडमपार्कजवळ रोखून धरले. त्यावेळी मंत्री बंडेप्पा काशेमपूर यांनी आंदोलनस्थळी शेतकऱयांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त शेतकऱयांनी त्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री आंदोलनस्थळी आल्याशिवाय माघारी परतणार नाही, अशी मागणी केली. यावेळी शेतकरीनेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी विधानसौधमध्ये बोलावून घेतले. यावेळी मागण्यांविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कुमारस्वामी यांनी दिले.

याचवेळी शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने बेळगावहून शेतकऱयांच्या आंदोलनाबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. याचवेळी कुमारस्वामी यांनी शेतकऱयांविषयी आपल्याला आदर आहे. आपण कोणाचाही अपमान केलेला नाही. एखाद्यावेळेस आपण केलेल्या विधानामुळे दुखावला असाल तर माफी मागत आहे, असे सांगितले. त्यामुळे शेतकऱयांनी 15 दिवसात प्रमुख मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला.

काँग्रेसच्या किसान घटकाकडून आमदारांना पत्र

राज्यातील ऊस उत्पादकांची थकीत बिले ठेऊन घेतलेल्या साखर कारखान्यांचे मालक असणाऱया काँग्रेस आमदारांना पक्षाच्या किसान घटकाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. अनेक साखर कारखाने काँग्रेस आमदारांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे पक्षातील नेत्यांनी आधी शेतकऱयांची थकीत बिले द्यावीत, अशी सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या किसान घटकाचे अध्यक्ष सचिन मिगा यांनी एस. एस. मल्लिकार्जुन, सतिश जारकीहोळी, आनंद न्यामगौडा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना उसाची थकीत बिले देण्यासंबंधी पत्र पाठविले आहे.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राज्यातील शेतकऱयांच्या समस्येसंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 3 वाजता विधानसौधमध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. ऊस उत्पादक, शेतकरी संघटनांचे नेते, साखर कारखान्यांचे मालक व इतर खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Related posts: