|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कौतुकाची आस

कौतुकाची आस 

लहानपणी दिवाळीच्या आधीच आई फराळाचे पदार्थ करायला घेई. तिच्या हाताला अप्रतिम चव होती. फराळाचे सगळेच पदार्थ ती लीलया उत्तम करीत असे. आईला हे पदार्थ इतरांच्या आयांपेक्षा उत्तम करता येतात याचे अप्रूप वाटे. पण आम्ही तेव्हा एका लहान खोलीत रहात होतो. त्यामुळे खोलीभर तळणीचे वास दरवळत. भूक मरून जाई. शिवाय त्या काळात फराळाचे जिन्नस करून थकली की आई रोजचा स्वयंपाक थोडक्मयात उरकून घेई. जेवणाचे हालच होत. 

पैशांची ओढाताण झाली तरी आई शेजारीपाजारी, नातलगांना डबे भरून देता येईल इतके बनवी. मग त्यांच्याकडून रिटर्न फराळाचे डबे येत. त्यातले पदार्थ तितकेसे बरे नसत. पण शेजाऱयांनी, नातलगांनी कौतुक केले की आई मोहरून जाई.

पुढे आमचे घर दोन खोल्यांचे झाले तेव्हा आईच्या औदार्याला धुमारेच फुटले. ती निरनिराळे मसाले, लोणची, वाळवणे बनवू लागली. जवळच्यांना देऊ लागली. घरात ओढाताण होऊ लागली. काही नातलग लाजेकाजेस्तव या वस्तूंच्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून काहीबाही वस्तू देत. एक लांबची श्रीमंत आत्या वर्षभरासाठी लागणारे मसाले आणि लोणची करून घेई आणि चक्क त्याचे पैसे देई. एकदा केव्हातरी लग्नसमारंभात ती कोणाजवळ बोलली की त्यांना मदत व्हावी म्हणून मी हे पदार्थ विकत घेते. हे समजल्यावर मात्र आम्ही साऱयांनी आईवर जोरदार दबाव आणून हे उद्योग थांबवले.

आता आई थकली आहे. पडून असते. बायकोने सगळे पदार्थ शिकून घेतले आहेत. आणि आता दरवषी बायको देखील हे पदार्थ जास्त प्रमाणात करते. तिच्या मैत्रिणींना वाटते. त्यांच्याकडून कौतुक करून घेते.

हे सगळे काय असते? नवरा-बायको-मुलेबाळे यांनी केलेले कौतुक पुरत नाही का एखाद्या गृहिणीला? त्यातून ती स्वतःला व्यक्त वगैरे करू बघत असते का? कोणास ठाऊक.

हौसेने कविता वगैरे करणारे साधेसुधे लोक पदरमोड करून पुस्तक छापतात आणि परिचयातल्या लोकांना बळे बळे भेट देतात. जुन्या पिढीतल्या आणि आमच्या पिढीतल्या नोकरी न करणाऱया स्त्रियांची ही तशीच मानसिक गरज असेल का?

या स्त्रियांना किंवा आसपासच्या कवी वगैरे लोकांना हसावेसे वाटत नाही एवढेच खरे.

Related posts: