|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘अवकाळी’चा गहजब

‘अवकाळी’चा गहजब 

दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्राचा काही भाग होरपळून निघत असतानाच अनेक जिल्हय़ांना अवकाळी पावसाने दणका दिल्याने राज्यात ‘दुष्काळात तेरावा’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘गाजा’ चक्रीवादळाचा प्रभाव व कमी दाबाच्या पट्टय़ाचा हा परिणाम असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. किंबहुना या माध्यमातून पुन्हा एकदा हवामानातील चढउतार वा बदलत्या हवामानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अवकाळीच्या या गहजबाशी कसा सामना करायचा हेच भविष्यात आपल्यापुढील सर्वांत मोठे आव्हान असेल. यंदा देशभर सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात यंदा अपेक्षित मोसमी पाऊस झाला नाही. केरळसारख्या राज्यात अतिरिक्त पाऊस नोंदविला गेला असतानाच महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद होऊ शकली नाही. त्यामुळे परतीच्या पावसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र, तोही चोरपावलांनी परतल्याने यंदा पहिल्या दोन अडीच महिन्यांचा अपवाद वगळता पावसाचे अस्तित्व तितकेसे जाणवले नाही. परिणामी महाराष्ट्रासारख्या राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत. मांजरा, माजलगावसारखी धरणे कोरडीठाक असून, लातूरसारख्या जिल्हय़ावर पुनश्च रेल्वेने पाणी पुरविण्याचे संकट घोंघावत आहे. अनेक जिल्हय़ांना आत्तापासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उन्हाळय़ात या जिल्हय़ांची स्थिती अधिक बिकट होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून 26 जिल्हय़ांमधील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यातील 112 तालुक्यात गंभीर स्थिती असून, 39 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पिण्याबरोबरच शेती व चाऱयाची प्रश्नांशी महाराष्ट्र दोन हात करीत असतानाच त्याला अवकाळीचा फटका बसला आहे. याचा मुख्यत: खरिपाच्या पिकांना व फळबागांना फटका बसल्याचे दिसते. टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, मेथी, कोंथिबिरीसह भाजीपाला मातीमोल होणे म्हणजे तोंडचा घास काढण्यासारखे म्हटले पाहिजे. कोकणात आंबा व भातपिकाला याची झळ बसल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. याशिवाय सोयाबीन, भुईमूग, द्राक्ष पिकासह ऊसतोडणी, गूळ उत्पादन, नाचणी पीक काढणीवर याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळते. असे असले, तरी तूर, ज्वारी, गहू, हरभरा, करडई यासारख्या रब्बी पिकांना हा पाऊस निश्चितच पोषक ठरू शकतो. हा त्यातल्या त्यात काही प्रमाणात का होईना दिलासा म्हणायला हवा. किंबहुना, फायदय़ापेक्षा यातून नुकसानच अधिक संभवते. कारण फळबागा, ऊसासह शेतपिकांना अवकाळीने दिलेल्या तडाख्याची व्याप्ती मोठी आहे. शिवाय काही भागात वादळी पावसाने लोकांच्या घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याकडे शेतकरी हा कायम दुष्टचक्रामध्येच अडकलेला असतो. ओला वा कोरडा दुष्काळ, विविध रोगांचा प्रार्दुभाव, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, कर्जबाजारीपण यासारख्या गोष्टी त्याच्या पाचवीलाच पूजलेल्या असतात. पुढचे काही दिवसही अवकाळीचे हे सत्र कायम राहण्याची शक्यता आहे. या अवचित पावसाच्या केंद्रस्थानी ‘गाजा’ चक्रीवादळ असल्याचे मानले जाते. तामिळनाडूत हाहाकार उडवून देणाऱया या वादाळाने 40 ते 50 जणांचे बळी घेतल्याचे आकडेवारी सांगते. त्याच्या परिणामाशिवाय अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या जवळ व बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच द्रोणीय स्थितीही या पावसाला कारणीभूत ठरल्याचे हवामानतज्ञ सांगतात. महाराष्ट्रात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हे पाहता आणखी काही दिवस अवकाळीचा तडाखा असाच सुरू राहिला, तर नुकसानीचे प्रमाण निश्चितपणे वाढू शकते. त्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना करायला हव्यात. सध्या महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱयांना मदतीचे वाटप करण्यासाठी 2200 कोटीच्या निधीची सरकारकडून तरतूद करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱयांपर्यंत वेळेत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. आता नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवरही नुकसानीचे पंचनामे व्हायला हवेत. राज्यात चालू वर्षी 2300 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे. कर्जमाफी म्हणजे निव्वळ धूळफेक असते, हे एव्हाना साऱया महाराष्ट्रालाच काय, देशाला कळायला हरकत नाही. शेतकऱयांच्या मदतीचा आपल्याकडे मोठा गवगवा होत असला, तरी प्रत्यक्षात एकूणच धोरणे ही शेतकरीविरोधी असल्यासारखीच आहेत. मुळात आज शेती हा सर्वात मोठी जोखीम असलेला उद्योग बनलेला आहे. इतकी जोखीम असलेला दुसरा कोणताही व्यवसाय नसावा. उद्योगपतींना रेड कार्पेट घालणाऱयांनी त्या दृष्टीने शेतकऱयांसाठी अनुकूल वातावरण निर्माण गरज आहे. बदलते हवामान वा लहरी निसर्गाचे आव्हान आता अधिकच जटिल होताना दिसते. एवढय़ा महिनाभराचाच विचार केला, तर ऑक्टोबर हीट, थंडीची चाहूल अन् पावसाचा दणका असे तिन्ही ऋतू आपल्याला एकाच वेळेस अनुभवायला मिळाले. खरे तर थंडी आधीच पडणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही तिचे अस्तित्व जाणवण्यास सुरुवात झालेली नाही. उलटपक्षी ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढलेला दिसतो. ऋतूचक्र बदलत आहे की काय, अशी शंका घ्यायला निश्चित जागा आहे. ढगफुटी, दुष्काळ, थंडी वा उष्णतेची लाट, गारपीट अशा संकटांना आपल्याला अधूनमधून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या साऱयाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना कराव्या लागतील. या दृष्टीने पीकपद्धतीत काही बदल करावे लागतील का, यावरही तज्ञांनी ऊहोपाह करावा व त्याबाबत शेतकऱयांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागानेही अचूक अंदाज वर्तविला, तर नक्कीच शेतकऱयांचे नुकसान टळू शकते. ग्लोबल वार्मिंगवर जगभर चर्चा होत आहे. हे बघता वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा समतोल यावरही कुठेतरी गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.

Related posts: