|Saturday, December 15, 2018
You are here: Home » उद्योग » गुजरातचा फोकस आफ्रिकन राष्ट्रांवर

गुजरातचा फोकस आफ्रिकन राष्ट्रांवर 

व्हायब्रंट गुजरात समीटमध्ये विशेष दिवस

प्रतिनिधी / पुणे

गुजरातचे तत्कालीन मुख्यंमत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या व्हायब्रंट गुजरात या गुंतवणूक कार्यक्रमाचे 9 वे अधिवेशन येत्या जानेवारीमध्ये होत असून, यामध्ये आफ्रिकन राष्ट्रांच्या प्रदर्शनाठी विशेष दिवस राखून ठेवण्यात आल्याची माहिती गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

2013 साली गुजरातमधील गुंतवणुकीसाठी नरेंद्र मोदी यांनी व्हायब्रंट गुजरात संकल्पना पुढे आणली. त्यानंतर दर दोन वर्षांनी व्हायब्रंट गुजरात समीटचे आयोजन करण्यात येते. यात देशविदेशातील कंपन्या, गुंतवणूकदार, लहानमोठे उद्योजक सहभागी होतात. याद्वारे एकाच छताखाली गुंतवणूकदार व उद्योजक येत असल्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळते. येत्या जानेवारीमध्ये 18 ते 20 जानेवारीदरम्यान गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समीटचे आयोजन करण्यात आले आहे. या समीटमध्ये बायर सेलर मीट, राउंड टेबल कॉन्फरन्स, एमएसएमई मीट, प्रदर्शन, सेमीनार होणार आहेत. यासाठी देशविदेशातील कंपन्या, गुंतवणूकदार, उद्योजक सहभागी होतील.

समीटमधील एक दिवस हा पूर्णपणे आफ्रिकन देशांसाठी राखीव आहे. आफ्रिकेत गुंतवणुकीच्या संधी, आफ्रिकन देशांसाठी भारतातील गुंतवणूक, रोजगार, उद्योग आदींचे प्रदर्शन तसेच सेमीनारही याठिकाणी होणार आहे. याबरोबरच या समीटमध्ये सर्व राज्यांना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांचेही प्रदर्शन येथे होणार आहे. यामुळे बाहेरील राष्ट्रांना वा कंपन्यांना येथे गुंतवणुकीचे पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे न्यू इंडिया हेच व्हायब्रंट गुजरातचे व्हीजन आहे, असे पटेल यांनी सांगितले.

A

Related posts: