|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » वरसगावची गळती वाढल्यास पुणे सोडावे लागेल… ; अभ्यासक राजेंद्र माहुलकर यांची भीती

वरसगावची गळती वाढल्यास पुणे सोडावे लागेल… ; अभ्यासक राजेंद्र माहुलकर यांची भीती 

पुणे / प्रतिनिधी

  •  ‘मगरपट्टा, ऍमोनारा, नांदेडसिटी’ म्हणजे जलराक्षस

पुण्यामध्ये ‘मगरपट्टा, ऍमोनारा आणि नांदेडसिटी’ हे तीन जलराक्षस निर्माण झाले असून, ते कालव्यामध्ये थेट पंप लावून पुण्याचे सर्वाधिक पाणी खेचत आहेत. विशेष म्हणजे त्यांना विचारणारे कोणी नाही. भविष्यात वेळ आल्यास या तिन्ही ठिकाणांचे पाणी बंद करावे लागेल. तसेच वरसगाव धरणांत आता गळती होत आहे. भविष्यात ती वाढल्यास पुणेकरांना पुणे सोडावे लागेल, असा गंभीर इशारा अभ्यासक राजेंद्र माहुलकर यांनी मंगळवारी येथे दिला.

मराठी विज्ञान परिषद आयोजित ‘पुण्याचा पाणीपुरवठा मिथक आणि सत्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. पानशेत व वरसगाव ही दोन्ही धरणे सिंचनासाठी आहेत. तर पुण्यासाठी टेमघर हे एकमेव धरण झाले. मात्र, आजची स्थिती वेगळी आहे. पुण्याची लोकसंख्या 35 की 45 लाख माहीत नाही, तसे आज पुण्यातील पाण्याची गळती कळत नाही, अशी स्थिती आहे. लोकसंख्येबरोबरच वाढती हॉटेल्स, मॉल्स अशा कमर्शिअल वापरात येणारे पाणी, इंडस्ट्री, इन्स्टिटय़ुशनमधील 7 लाखांहून अधिक राहणाऱया मुलांकडून होणारा पाण्याचा वापर आदी साऱयाचा विचार यामध्ये होताना दिसत नाही.

जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये कायम वादंग सुरू असतो. सरकारी कार्यालयांकडूनही महानगरपालिकेला पाण्याचे पैसे दिले जात नाही. हा रिव्हेन्यू लिकेजेसही सुमारे 20 ते 40 टक्के इतका गंभीर स्वरूपात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांना कायद्याचा बडगा बसायला हवा. वर्तमानपत्रांतून या गंभीर स्थितीविषयी कायम छापून येत आहे. मात्र, पुणेकर मुग गिळून गप्प आहे. याबाबत मोठे जनआंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचे मत माहुलकर यांनी व्यक्त केले.

लवासाचे पाणी हे पुणेकरांकडून पर्यटनाच्या नावाखाली चोरलेले पाणी आहे. ते पिण्यासाठी हवे की श्रीमंत लोकांचे चोचले पुरविण्यासाठी हे पुणेकरांनी ठरवून घ्यावे आणि त्यानुसार प्रतिक्रिया द्यावी, असे मतही माहुलकर यांनी व्यक्त केले.