|Thursday, May 23, 2019
You are here: Home » उद्योग » तीन सत्रांच्या तेजीला जागतिक स्थितीने लगाम

तीन सत्रांच्या तेजीला जागतिक स्थितीने लगाम 

सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, ही अस्थायी स्थिती असल्याचे तज्ञांचे म्हणणे

वृत्तसंस्था / मुंबई

तीन दिवसांच्या सलग तेजीनंतर मंगळवारी भारतीय शेअरबाजारांनी घसरण अनुभवली आहे. जागतिक शेअरबाजारांमधील उदासिनतेचा हा परिणाम असल्याचे प्रतिपादन तज्ञांनी केले. रूपया वधारत असताना आणि कच्च्या इंधन तेलाचे दर कमी होत असतानाही ही घसरण झाली हे विशेष मानण्यात येत आहे. मात्र ही स्थिती अस्थायी असून येत्या दोन तीन सत्रांमध्ये पुन्हा शेअरबाजार उसळी घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300.37 अंकांनी घसरून 35,474.51 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवसअखेर 107.20 अंकांनी उतरून 10,656.20 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही लक्षणीय घट दिसून आली.

ब्रेक्झिट प्रकरणातील अनिश्चितता वाढल्याने युरोपियन शेअरबाजारांची काही प्रमाणात घसरण झाली. त्याचा परिणाम इतर जागतिक शेअरबाजारांवरही झाला. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मंदावत असल्याचे गेल्या आठवडय़ात दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट येण्याची चिंता काही अतिसावध तज्ञांना वाटू लागली आहे. तथापि, हे बदल किरकोळ स्वरूपाचे असल्याने त्यांचा दीर्घकालीन परिणाम होणार नाही, असेही काही तज्ञांचे मत आहे.

मंगळवारच्या व्यवहारात येस बँकेच्या समभागांना सर्वात मोठा फटका बसला. त्यांचा दर 6.10 टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल टाटा स्टील, वेदांता, एनटीपीसी, भारती एअरटेल, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि मारूती सुझुकी यांची घसरण झाली. ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, हीरो मोटर कॉर्पोरेशन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंटस्, ऍक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो आणि आयटीसी यांचेही समभाग घसरले.

आशियायी शेअरबाजारांचा विचार करता, शांघाई काँपोझिटची घसरण 2.13 टक्के झाली. हाँगकाँगचा हँगसेंग 2.01 टक्के घसरला. जपानचा निक्की 1.09 टक्क्यांनी तर सिंगापूर इंडेक्स 1.24 टक्क्यांनी उतरला. येत्या दोन दिवसांमध्ये स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related posts: