|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली

दिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगावच्या श्रीहरिमंदिराचा 109वा दिंडी महोत्सव आज बुधवार दि. 21 रोजी भक्तीभावाने साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली आहे. गोव्याच्या कानाकोपाऱयांतून तसेच शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून भाविक या दिंडी महोत्सवाला उपस्थिती लावतात.

आज दिंडी महोत्सवाचा मुख्य उत्सव असून सकाळी 7 वा. श्री हरिमंदिरात धार्मिक कार्यक्रम, श्रींस अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी 10 वा. बोरी येथील सुरेंद्र बोरकर व साथीचा भजनाचा कार्यक्रम. दुपारी 12.30 वा. महाआरती, तीर्थ-प्रसाद व अन्नसंतर्पण होईल. संध्याकाळी 4.30 वा. वारकऱयांच्या भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी 6 वा. श्री विठ्ठल रखुमाईची धार्मिक ग्रंथासह रथात स्थापना.

 रात्री दिंडीचे श्री राम मंदिर, श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिर, कोंबवाडा येथे प्रस्थान होईल. या ठिकाणी कोंब येथील श्री विठ्ठल मंदिराच्या पालखीशी भेट झाल्यानंतर गुरुवार दि. 22 रोजी दुपारी 12.30 वा. श्रींच्या दिंडीचे श्री हरिमंदिरात आगमन व तद्नंतर गोपाळकाला, महाआरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी 7.30 वा. श्रींच्या भेटीस आलेल्या वस्तुंची ‘पावणी’ व रात्री 8 वा. पं. रघुनंदन पणशीकर यांच्या संगीत कार्यक्रमाने दिंडी महोत्सवाची सांगता होईल.

दिंडी स्पर्धा महोत्सवात रंग भरणार

श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक संघटनेच्यावतीने दिंडी महोत्सवानिमित्त केलेली दिंडी स्पर्धा खऱया अर्थाने दिंडी महोत्सवात रंग भरणारी ठरू लागली आहे. या दिंडी स्पर्धेमुळे मठग्रामात भक्तीभावाचे वातावरण निर्माण होत असते. सात वर्षापासून या दिंडी स्पर्धेचे यशस्वी आयोजन होत असून स्पर्धेत गोव्यातील विविध भागातून येणारी पथके सर्वाचे लक्ष वेधून घेत असतात. सुंदर पदन्यास, पारंपरिक वेशभूषा व देवाचे नामस्मरण यामुळे दिंडी महोत्सवात रंग भरतो. या शिवाय दामाबाबाले घोडे तर्फे आकाशकंदील व फळ आणि भाजी सजावट स्पर्धा देखील होणार आहे.

रांगोळी स्पर्धा ठरते लक्षवेधी

मडगाव सॉलीड पार्टी ट्रस्ट तर्फे दिंडी महोत्सवानिमित्त पालिका उद्यानात आयोजित केली जाणारी रांगोळी स्पर्धा देखील सर्वाचे लक्ष वेधून घेणारी ठरते. या स्पर्धेत रांगोळी कलेचा सर्वांग सुंदर आविष्कार घडतो. सकाळच्या सत्रात ही स्पर्धा होणार असून संध्याकाळी ही रांगोळी सर्वांसाठी खुली केली जाते. दरम्यान, कोंबवाडय़ावर देखील संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालणार आहे.

Related posts: