|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर परिसरात तुळशी विवाह सोहळा उत्साहात

शहर परिसरात तुळशी विवाह सोहळा उत्साहात 

प्रतिनिधी/ बेळगाव

यावर्षीच्या मंगलकार्याचा शुभमुहूर्त साधण्यासाठीचे पर्व मंगळवारी तुळशी विवाहाच्या निमित्ताने सुरू झाले. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी तुळशी विवाह समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्यात येतो. मंगळवारी शहरात सर्वत्र मोठय़ा उत्साहात तुळशी विवाह पार पडले.

मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी ऊस, झेंडूची फुले, चिंच, आवळे, फुलांच्या माळा, ओटीचे सामान खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. उसाचा मांडव तयार करून वृंदावनात झेंडूची फुले, चिंच, आवळे ठेवण्यात आले होते. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.

सायंकाळी मंगलाकाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटी सामान, अक्षता आदी साहित्य वापरून सर्व विधीनुसार तुळशीचा विवाह कृष्णाबरोबर लावण्यात आला.