|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘इफ्फी’ची गोव्यातील पंधरा वर्षे

‘इफ्फी’ची गोव्यातील पंधरा वर्षे 

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) म्हणजे गोव्यासाठी वाजपेयी सरकारने दिलेली देणगी आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवाविषयीचे आकर्षण गोमंतकीयांबरोबरच भारतीय तसेच जगभरातील चित्रपट संस्कृतीशी संबंधितांमध्ये वाढतच आहे. वास्तविक या महोत्सवाची गोव्यात सुरुवात व्हायची होती त्या 2004 -05 यावर्षी इफ्फीवरुन गोव्यात आणि दिल्लीतही अक्षरशः रणकंदन माजले होते. कोणत्याही परिस्थितीत इफ्फी गोव्यात होता कामा नये, यासाठी चित्रपट क्षेत्रातील काही मातब्बर व्यक्ती एका बाजूने तर काही दुसऱया बाजूने दिल्लीतील राजकीय धेंडेही प्रयत्नरत होती. तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी इफ्फी गोव्यात घेण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी घेतलेले परिश्रम आणि वापरलेली कल्पकता यामुळे ठरलेला 36 वा इफ्फी गोव्यातच झाला. गोवेकरांनी देशवासियांचीच नव्हे तर सहभागी झालेल्या विविध देशांच्या चित्रपटक्षेत्रांतील मान्यवरांचीही मने जिंकली. परिणामी इफ्फीसाठी गोवा हे कायम स्थळ बनले आहे. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील समस्त गोवेकरांचे ते यश होते. सध्या गोव्यात 49 वा इफ्फी सुरु असून त्याची समारोप 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

जागतिक मैत्रिपूर्ण संबंधांसाठी इफ्फी

इफ्फी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगातील बहुचर्चित चित्रपट महोत्सव बनला असून आशिया खंडातील तो अग्रगण्य महोत्सव आहे. चित्रपट संस्कृतीची प्रदीर्घ परंपला असलेल्या आपल्या देशात 24 जानेवारी 1952 साली पहिला इफ्फी मुंबईत झाला. त्यानंतर दिल्ली, चेन्नई, कोलकातासह देशभरातील अनेक शहारांमध्ये झाला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्यात 20 देश सहभागी व्हायचे नंतर हा आकडा 25, 30, 42 असा करत सध्या तो 68 वर पोहोचला आहे. पाहिल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांचे प्रदर्शनच व्हायचे. नंतर त्यामध्ये जागतिक चित्रपट स्पर्धाही सुरु झाली, पुरस्कारही देण्यात येऊ लागले. सहभागी होणाऱया देशांतील दर्जात्मक चित्रपट भारतीयांना पाहता यावे, एकमेकांची चित्रपट संस्कृती समजून घेता यावी, देशांतील सामाजिक व सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, देशांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध निर्माण होण्यास मदत व्हावी, असे अनेक उद्देश बाळगून स्वातंत्र्यांनंतर जगात आपले संबंध प्रस्तापित करण्यासाठी भारत सरकारने हा महोत्सव सुरु केला.

गोव्य़ासमोर उभ्या केल्या अडचणी

हा चित्रपट महोत्सव गोव्यात घेण्याचा निर्णय झाला तेव्हा केंद्रात व गोव्यातही भाजप सरकार होते. केंद्रातील भाजप सरकार गेल्यानंतर नव्या सरकारने महोत्सव गोव्यात होऊ नये यासाठी महोत्सव गोव्यात नको, असे स्पष्ट न सांगता आडमार्गाने गोवा सरकारसमोर अचडणी उपस्थित करुन खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हार मानली नाही. गोव्यात चित्रपट संस्कृती नाही, चित्रपट निर्मिती होत नाही, साधनसुविधा नाहीत, अशी अनेक कारणे देण्यात आली. खरे म्हणजे सरकार ही कायम व्यवस्था असते. सत्ताधारी पक्ष बदलला म्हणून सरकार बदलत नाही, हे आमचे राजकारणी बऱयाच वेळ विसरतात, त्याचेच हे उदाहरण.

गोव्याने ‘इफ्फी’चे शिवधनुष्य पेलले

 मात्र गोव्याने चित्रपट महोत्सवासाठी लागणाऱया सर्व साधनसुविधा अल्पावधीत निर्माण  केल्याच, त्याचबरोबर पणजीच्या वाहतुकीत सुरळीतपणा तसेच एकंदर पणजीच्या सौंदर्यांत भर घालणारे महत्वाकांक्षी प्रकल्पही यशस्वीरित्या उभारुन दाखविले. त्यामध्ये मांडवी पुलापासून जुन्या कस्टम हाऊसमोरील जेटीपर्यंत पूल साकारला. आज जो रस्ता दिसतो तो म्हणजे पूल आहे, हे अनेक गोवेकरांनाही माहीतच नाही. अत्त्याधुनिक साधनसुविधांनी सुसज्ज चार स्क्रीन्सचे मल्टिप्लेक्स उभारले. गोवा कला अकादमीत चित्रपट प्रदर्शन यंत्रणा बसविली. हे व अन्य सर्व काही करताना गोवा सरकारसमोर केंद्र सरकार एका बाजूने खोडा घालत होते तर, दुसऱया बाजूने खुद्द काही गोवेकर विरोधाचा सूर आळवत होते. तरीही गोवा सरकारने हे शिवधनुष्य पेलले. तो महोत्सवाने दिल्लीतल्या राजकीय धेंडांना तोंडात बोटे घालायला भाग पाडले. त्याची चर्चा जगभर झाली. त्यानंतरच्या कान्स महोत्सवामध्ये तर गोव्याच्या इफ्फीचीच चर्चा होती. गेली चौदा वर्षे हा चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यातच होत असून प्रत्येकवर्षी त्याची सुधारीत आवृत्ती जगभरातील चित्रपट जगतातील मान्यवरांच्या प्रंशसेस पात्र ठरत आहे.

या चित्रपट महोत्सवामुळे गोव्याने आतापर्यंत काय गमावले, काय कमविले? याचा हिशोब करायला गेल्यास जमेचेच पारडे जड दिसत आहे. अत्त्याधुनिक मल्टिप्लेक्स, पूल, रस्ते, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, पदपथ, पथदीप नूतनीकरण, जेटी नूतनीकरण-बांधकाम असा विकास झाला. चित्रपट निर्मिती संस्कृती रुजू लागली आहे. दरवर्षी किमान 20 चित्रपट निर्माण होत असून किमान एक कोकणी चित्रपट दरवर्षी इंडियन पॅनोरामामध्ये सन्मानाने प्रदर्शन होत आहे. नाटक, तियात्र, संगीत, साहित्य, कला या क्षेत्रातील कलाकारांना चित्रपट निर्मितीतही संधी मिळू लागली आहे. बॉलिवूडमध्ये योगदान देणारे मूळ गोमंतकीय गोव्यात येऊन गोव्याच्या चित्रपट क्षेत्रात योगदान देत आहेत. चित्रपट महोत्सवाच्या काळात येणारे सर्वजण गोवा दर्शन करु लागल्याने निर्मात्यांना, दिग्दर्शकांना गोवा अधिक जवळून पाहता आल्याने हिंदीसह भारतीय भाषांतील चित्रपटांचे चित्रीकरण आता गोव्यात मोठय़ा प्रमाणात होऊ लागले आहे. महोत्सव काळात पर्यटकांची संख्या वाढल्याने त्या व्यवसायालाही लाभ होतोय. लोककला, लोकसंगीत, खाद्यपदार्थ यांचा आस्वाद महोत्वातील प्रतिनिधींना मिळत असून गोव्याच्या आदरातिथ्याचा अनुभव घेऊन माघारी जाणारे प्रतिनिधी मनात पुढच्या वर्षीही महोत्सवात सहभागी होण्याचा निश्चय करुनच जातात. यातून गोव्याची चांगली प्रतिमा राखली जात आहे. इफ्फी व्हावा तर गोव्याच, अशी प्रतिक्रिया चित्रपट जगतातील मान्यवरांकडून उमटत आहे. इफ्फीचा दिमाख, सुत्रबद्ध तसेच सुनियोजित आयोजन, अत्यंत आपुलकीने होणारे आदरातिथ्य, सर्वांना देण्यात येणार मान-सन्मान ही गोव्यातील इफ्फीची वैशिष्टय़े ठरली आहेत. दरवर्षी सुधारणा करणेही गोव्याने चालू ठेवले असून यावर्षीचे खास आकर्षण म्हणून देशाला जगामध्ये नावलौकिक मिळवून देणाऱया क्रीडापटूंवरील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत करण्यात येत आहे. एकंदरीत या 15 वर्षांत या चित्रपट महोत्सवाने गोव्याच्या नावलौकिकात भरच टाकली असून स्थानिकांनाही खूप संधी दिल्या आहेत.

Related posts: