|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेगावात साडेसहा लाखांचा सशस्त्र दरोडा

शेगावात साडेसहा लाखांचा सशस्त्र दरोडा 

वार्ताहर /शेगाव :

जिह्यात सलग दुसऱया दिवशी सशस्त्र दरोडय़ाचे सत्र सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील दरोडय़ाची घटना ताजी असताना जत तालुक्यातील शेगाव येथे मंगळवारी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य साहेबराव शिंदे यांच्या घरावर पाच ते सातजणांच्या टोळीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कुटुंबाला धमकावत जवळजवळ तीन लाख रोख रक्कम, सात तोळे सोन्याचे दागिने असा साधारण 6.50 लाखांच्या किंमतीचा मुद्देमाल लंपास केला यावेळी साहेबराव शिंदे व त्यांच्या पत्नी वर्षाराणी यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली.

दरम्यान सलग दुसऱया दिवशी जिह्यात सशस्त्र दरोडा पडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी, जत तालुक्यातील शेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव विठ्ठल शिंदे हे सिमेंट-विट व पल्बिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. ते शेगावात आपली पत्नी व दोन मुलांसह राहत आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शिंदे कुटुंबिय घरी झोपी गेले असताना रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक त्यांच्या घराचा दरवाजा धडधडू लागला. आपल्या घराच्या दरवाजावर कोण थाप मारत आहे, हे पाहण्यासाठी साहेबराव शिंदे  जाणार तोच दरोडेखोरांनी एक मोठा दगड दरवाजावर घालून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व साहेबराव आणि त्यांच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. दरोडेखोरांनी सौ. वर्षाराणी यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र, कर्णफुले, सोन्याच्या बांगडय़ा व साहेबराव यांच्या हातातील दोन अंगठय़ा हिसकावून घेतल्या. यावेळी साहेबराव यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला.