|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सुरेश पाटलांच्या ‘मेंटली फिटनेस’ तपासणीची मागणी

सुरेश पाटलांच्या ‘मेंटली फिटनेस’ तपासणीची मागणी 

   प्रतिनिधी /   सोलापूर :

केवळ सोलापूर जिह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात सर्वत्र चर्चा असलेल्या सोलापूरच्या सुरेश पाटील विषबाधा प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह ज्या पाचजणांवर विष प्रयोग केल्याचा गंभीर आरोप ज्या सुरेश पाटलांनी केला आता त्यावर त्यांच्याच ‘मेंटली फिटनेस’ संबंधी चौकशी करण्याची मागणी संशय व्यक्त केलेल्यांकडून केली जावू शकते.

 विशेषत्वे, या संदर्भात कायदेतज्ञांकडे मंगळवारपासून चर्चेच्या फैरी झडत असून तशी चौकशीची मागणी करण्याची तयारी या संबंधीतांकडून केली जाणार असल्याची चर्चा ज्यांच्यावर विषप्रयोगाचे आरोप आहेत त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये आहे. त्यामुळेच विष प्रयोगासंबंधी केलेले आरोप पाटील यांच्या अंगलट येणार का? या वेगळ्या मुद्याभोवतीदेखील शहर भाजपाच्या गोटात चर्चा सुरु झाली आहे.

   थेलीयमच्या विषबाधेतून आपणास संपवण्याचा कट संगनमताने करण्यात आला. तो कट महापौर शोभा बनशेट्टी तसेच त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, सोलापूर शहर भाजपाचे अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आणि शिवसेनेचे नगरसेवक सुनिल कामाठी यांनी केला असल्याचा गंभीर  आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे.

 तद्नंतर ज्यांच्यावर हा आरोप लावला गेला त्या संबंधीतांची कायदेतज्ञांकडे भागमभाग सुरु आहे. या दरम्यान कायदेतज्ञांची चर्चा करताना पाटील यांच्या संदर्भातील महत्वाचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे. पाटील हे साधारण वर्षभर आजारी होते. सध्यादेखील त्यांचे आरोग्य पूर्णपणे बरे झालेले नाही. अनेक महिने ते कोमात होते त्यामधून त्यांना अजून पूर्वीप्रमाणे स्मृती आलेली नाही.

  यासर्व पार्श्वभूमीवर, पाटील यांची मानसिक आणि शारिरीक तपासणी होणे गरजेचे आहे. त्यांचा मेंटली फेटनेस चांगला नसताना त्यांच्याकडून विष प्रयोगासंबंधी नावे घेवून आरोप केला गेला आहे. त्यामधील तथ्यांश समोर येण्यासाठी  त्यांचीच तपासणी केली जावी अशी मागणी महापौरांसह त्या पाच जणांकडून पोलीस आणि न्यायालयात केली जाणार असल्याची चर्चा त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये आहे.