|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » थकबाकी, दर एफआरपीनुसार द्या

थकबाकी, दर एफआरपीनुसार द्या 

प्रतिनिधी /बेंगळूर :

राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एफआरपी दरानुसार ऊस उत्पादक शेतकऱयांना दर द्यावा, 15 दिवसांत संपूर्ण थकबाकी द्यावी, चालू हंगामात दर आणि थकबाकीबाबत कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी कारखान्यांच्या मालकांनी घ्यावी, सरकारच्या मार्गसूचीनुसार प्रत्येक शेतकऱयाशी सक्तीने द्विपक्षीय करार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिल्या आहेत. असे असले तरी एफआरपीप्रमाणे दर दिल्यानंतर यातून तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वजा केल्यास शेतकऱयाच्या पदरी प्रतिटन दर कमी मिळणार आहे.  परिणामी सरकार आणि कारखानदारांनी साहाय्यधन दिल्यास शेतकऱयांना लाभदायक ठरणार आहे.

ऊसदर आणि थकबाकीसंबंधी उद्भवलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुरुवारी साखर कारखान्यांच्या मालकांशी चर्चा केली. बेळगावमधील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शेतकऱयांची थकीत बिले द्यावीत. शिवाय 2018-19 या हंगामात ऊस गाळप करताना केंद्र सरकारने ठरविलेला एफआरपी दर द्यावा. ऊस दर नियंत्रण मंडळाच्या निर्णयानुसार उत्पन्न वाटप सूत्राचा अवलंब करावा, वजन आणि रिकव्हरी ठरविताना या व्यवस्थेत पारदर्शकपणा राहण्यासाठी सरकारने जारी केलेल्या आदेशातील मार्गसूचींचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारांना दिल्या.

बैठकीप्रसंगी साखर कारखान्यांच्या मालकांनी आपल्या समस्यांची माहिती सविस्तरपणे मुख्यमंत्र्यांना दिली. देशात सध्या 230 लाख टन साखर शिल्लक आहे. साखरेच्या अधिक उत्पादनामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार उसापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. आता साखर कारखाने अडचणीत असताना साहाय्य करण्यासाठी साखर स्थिरता निधी स्थापन करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.