|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चोरटय़ांनी एकाच रात्रीत सात फ्लॅट फोडले

चोरटय़ांनी एकाच रात्रीत सात फ्लॅट फोडले 

बसंत-बहार रोडवरील अपार्टमेंटमधील घटना

प्रतिनिधी/ कोल्हापूर

    शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या परिसरात बुधवारी पहाटे चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. बसंत – बहार रोडवरील सहा बंद फ्लॅट, एका कंपनीचे कार्यालय फोडून चोरटय़ांनी पोलीस यंत्रणेसमोर आवाहन उभे केले आहे. एकाच रात्रीत सहा फ्लॅट फोडल्याने नागरीकांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. एका महिलेच्या सतर्कतेमुळे चोरीचे प्रकार उघडकीस आले असून याप्रकरणाची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.   

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरटय़ांनी बंद प्लॅट आणि कार्यालयाची रेंकी बसंत-बहार रोडलगत रॉयल हेरिस्टेज, नंदनवन पार्क, दिप्ती अपार्टमेंट या तीन अपार्टमेंट मधील सहा फ्लॅट आणि एका कंपनीचे कार्यालय फोडल्यामध्ये समावेश आहे. चोरटय़ांनी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास रॉयल हेरिस्टेज या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. प्रवेश करण्यापूर्वी चोरटय़ांनी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांची केबीन बाहेरुन लॉक केली. अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.2 फोडला. त्यानंतर चोरटय़ांनी त्याच्या लगतच्या नंदनवन पार्कमध्ये प्रवेश केला. या पार्कमध्ये राहणार्या एका भाडेकरुचा फ्लॅट फोडला. या फ्लॅटमधून पाच हजारांची रोकड लंपास केली. तसेच याच पार्कमधील एका कंपनीचे कार्यालयदेखील फोडले. पण चोरटय़ांच्या हाती काही ही लागले नाही. याचदरम्यान चोरटय़ांनी त्याच्या शेजारील दिप्ती अपार्टमेंट तीन बंद फ्लॅट फोडले. पण हे तिन्ही फ्लॅट रिकामेच होते. याच दरम्यान या अपार्टमेंटमधील ,का फ्लॅटमधील महिला पहाटेच्या वेळी कचरा बाहेर टाकण्यासाठी आली असता तिला अपार्टमेंटमध्ये चेहरा झाकले युवक दिसले. त्याना पाहून तिने चोर-चोर असे म्हणून आरडा ओरड सुरु केली. त्यामुळे चोरटय़ांनी येथून पलायन केले.

याप्रकारांची माहिती समजताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेची माहिती घेतली. याच दरम्यान पोलिसांनी अपार्टमेंटच्या सीसीव्हीटी पॅमेर्याची तपासणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती चोरटय़ांचे फुटेज लागले. या फुटेजमध्ये चेहरा ओळखू नये, याकरीता चेहराला टॉवेलसारख्या रुमालाने चेहरा झाकलेला आणि पाठीला सॅक लावलेले 27 ते 30 वयोगटातील युवक दिसत आहेत. या वर्णनावरुन पोलिसांनी चोरटय़ाचा शोध सुरु केला आहे.

चोरटय़ांकडून बंद फ्लॅटची रेकी

दिवाळी सुट्टीनिमीत्त बहुतांशी नागरीक परगावी गेलेले असल्याने शहरातील काही फ्लॅट बंद आहेत. याची रेकी करून चोरटय़ांनी डाव साधला असल्याची माहिती समोर आली आहे. शाहूपुरी परिसरातही अशाच प्रकारे रेकी करून चोरटय़ांनी सहा फ्लॅट फोडले. मात्र हे फ्लॅट रिकामेच असल्याने चोरटय़ांच्या हाती फारसे काहीच लागले नाही.

चोरटे सिसीटीव्हीमध्ये कैद

   बुधवारी पहाटे एक महिला कचरा टाकण्यासाठी अपार्टमेंटच्या खाली असता तीला काही युवक संशयास्पद रित्या आढळून आले. तिने चोर चोर असा आरडा ओरडा केल्याने चोरटय़ांनी पलायन केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून चोरटय़ांचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे.