|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » 99 व्या मराठी नाटय़संमेलन अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

99 व्या मराठी नाटय़संमेलन अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी 

मुंबईत झालेल्या मराठी नाटय़परिषदेच्या बैठकीत बहुमताने निवड

प्रतिनिधी/ मुंबई

सलग साठ तासांचे 98 वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन यशस्वी झाल्यानंतर आता 99 व्या मराठी नाटय़संमेलनाच्या आयोजनाची तयारीही सुरू झाली आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या मराठी नाटय़परिषदेच्या बैठकीत 99 व्या मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांची बहुमताने निवड झाली आहे.

आगामी नाटय़संमेलनासाठी श्रीनिवास भणगे, सुरेश साकोळकर, अशोक समेळ आणि प्रेमानंद गज्वी अशी चार नावे चर्चेत होती. अखेरीस प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 98 व्या मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून प्रेमानंद गज्वी संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. गज्वी यांच्या प्रत्येक साहित्य तसेच नाटय़कृतीमधून त्यांची सामाजिक बांधिलकी उमटते. प्रेमानंद गज्वी यांची ‘घोटभर पाणी’ ही एकांकिका प्रचंड गाजली. या एकांकिकेचे 14 भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. ढीवर ढोंगा, लागण हे कथासंग्रह, किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, पांढरा बुधवार, रंगयात्री, शुद्ध बीजापोटी ही नाटकं तसेच बेरीज वजाबाकीसारख्या एकांकिका प्रेमानंद गज्वी यांच्या लेखणीतून साकारल्या आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे नाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही चर्चेत होते. बोधी नाटय़परिषदेच्या माध्यमातून नवनवीन संहितांना त्यांनी राज्याच्या कानाकोपऱयात पोहोचवले. आजही बोधी नाटय़परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नव्या कल्पनांना प्रोत्साहन दिले आहे.

नाटय़संमेलन स्थळ पुढील महिन्यात निश्चित

99 व्या मराठी नाटय़संमेलन स्थळासाठी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड अशी तीन ठिकाणे चर्चेत असून पुढील महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मराठी नाटय़परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले. तसेच, याचवेळी संमेलनाच्या तारखाही जाहीर करण्यात येणार आहेत. 98 व्या मराठी नाटय़संमेलनाप्रमाणे हे संमेलनही वेगळे असेल, असा विश्वास प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला. यंदा प्रथमच यशवंत नाटय़मंदिर आणि परिषदेला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून 19 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्याचा विनियोग आगामी संमेलनासाठी करण्यात येणार आहे. नाटय़परिषदेच्या प्रत्येक सभासदाचे ऑडिट करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक शाखेचेही ऑडिट करण्यात येणार आहे. मयत सभासद किंवा डुप्लिकेट सभासद यांची छाननी करण्यात येणार आहे. बालरंगभूमी ते हौशी रंगभूमीसाठी काम करणाऱया ज्येष्ठ रंगकर्मींचे कार्य अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेण्यासाठी परिषद प्रयत्न करणार आहे.

विवेकवादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणार : प्रेमानंद गज्वी

अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली, याचा मला आनंद आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून नाटय़परिषदेला नेमके काय अपेक्षित आहे, याचा मी समन्वय साधणार आहे. एकमेकांची मनं न दुखवता मला काम करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी अजूनही विवेकवादी समाज निर्माण झालेला नाही. अजूनही प्रश्न तितकेच जटिल आणि गुंतागुंतीचे आहेत. सरकार दरबारी या प्रश्नांना न्याय मिळालेला नाही. साहित्य किंवा नाटकाच्या माध्यमातून सरकारला जागं करण्याची जबाबदारी नाटककार म्हणून माझ्यावर आहे आणि ती मी पार पाडणार आहे.