|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याच्या आयआरबी पोलिसांचे छत्तीसगढमध्ये समाजकार्य

गोव्याच्या आयआरबी पोलिसांचे छत्तीसगढमध्ये समाजकार्य 

औदूंबर शिंदे/ पणजी

भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) गोव्यातील दोन कंपन्या (180) पोलीस छत्तीसगढमधील नक्षली भागातील निवडणूक डय़ुटी संपवून काल शुक्रवारी 23 रोजी मध्यप्रदेश येथील शिवोनी या गावात पोहचले. येण्यापूर्वी त्यांनी छत्तीसगढ मधील लारीपूर आणि साकरा गावातील शाळेच्या मुलांना वह्य़ा, क्रीडा सामान वाटले. या कार्यामुळे गोवा पोलिसांची सर्वत्र स्तुती होत आहे.

छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश येथील निवडणूक डय़ुटी करण्यासाठी गोव्यातील आयआरबीच्या 180 पोलिसांना निवडणूक आयोगाने पाठविले होते. दि. 26 ऑक्टोबर रोजी या दोन कंपन्या रवाना झाल्या होत्या. या दोन्ही तुकडय़ांना छत्तीसगढ येथील राजनंदन जिल्हय़ातील डोंगरगाव या अती दुर्गम भागात ठेवण्यात आले होते. राहण्याची व्यवस्था नाही, पिण्यासाठी पुरवण्यात आले ते जड पाणी असल्याने पोलीस आजारी पडून लागले.

नारळ नसलेले जेवण नदीतील गोडे मासे, भाज्याही स्थानिक, स्वयंपाकी गोमंतकीय असला तरी जेवणासाठी बरीच कळ सोसावी लागत होती. वरून जेवणासाठी रोज 100 रुपये द्यावे लागत होते. पहिल्या टप्प्याची निवडणूक संपली व दुसऱया टप्प्यात या दोन तुकडय़ांना वेगवेगळय़ा ठिकाणी पाठवण्यात अले. छत्तीसगढ मध्ये ओरीसाच्या सीमेवर एक तुकडी लारीपूर येथे तर दुसरी तुकडी चिथोस गिराना येथे पाठवण्यात आली.

दोन्ही नक्षलीवाद्यांची क्षेत्रेs. कधी हल्ला होईल सांगता येत नाही. पोलीस म्हणजे दुश्मनड या नजरेनेच स्थानिक पहात होते. पण गोमंतकीय पोलिसांनी त्यांची मने जिंकली. पोलिसी हिसका न दाखवता पोलीस सहाय्यक व मदतनीस कसा असू शकतो याचा अनुभव लोकांना दिला. लोकांनीही सहकार्य केले.

पोलीस निरीक्षक दामोदर नाईक, उपनिरीक्षक संजीवन नाईक, रविकांत वेर्णेकर, विजयकांत फडते यांनी पुढाकार घेऊन शाळेतील मुलांना वहय़ा, पुस्तके आणली. शाळेचे बॅक ती मुले आयुष्यात पहिल्यांदाच पहात होती. मुलांसाठी क्रिकेटची बॅटबॉल, फुटबॉल तथा मुलींसाठी रिंगा, दोरी उडय़ा व इतर सामुग्री दिली.

पहिली ते आठवी इयत्ता पर्यंतचीच ही शाळा. दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी 100 कि. मी. लांब जावे लागते. त्यामुळे दहावी झालेले गावात कोणच नाहीत. अशिक्षीत लोक नक्षलवाद्यांच्या आमिषांना लवकर बळी पडले. 2010 मध्ये गिरोना येथे तर 6 नक्षलवाद्याना ठार करण्यात आले होते.

गोमंतकीय पोलिसांनी आधी स्थानिकांची मने जिंकून घेतली. त्यांना खाऊ पिऊ दिला. मुलांना शालेय सामुग्री दिली. मित्रत्वाचा हात पुढे केला. त्यामुळे या निवडणुकीत कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. हे दोन गाव सोडताना गावातील सरपंच इतर ज्येष्ठ मंडळी आणि स्थानिक भावनावश होऊन निरोप द्यायला आले होते. या गावाच्या इतिहासात जेवढे पोलीस आले त्यांनी फक्त वचक आणि दराराच दाखवला. पण गोमंतकीय आर्म पोलिसांनी एक वेगळे उदाहरण घालून दिले.

दोन्ही तुकडय़ा मध्यप्रदेशात दाखल

शुक्रवारी 23 नोव्हेंबर रोजी दोन्ही तुकडय़ा मध्यप्रदेश येथील बर्गद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील शिवोनी या गावात पोहचल्या आहेत. या गावात दुकाने आहेत. फाजीपाला, गोमंतकीय जेवणासाठी लागणारे नारळही त्यांना मिळाले आहेत. जेवणाची तक्रार आता संपली आहे. पाण्याची सोय ही झाली आहे. 28 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक संपल्यानंतर या दोन तुकडय़ा गोव्यात परतण्याची शक्यता आहे.