|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बेकायदा वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला

बेकायदा वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला 

प्रतिनिधी /चिपळूण :

खेड तालुक्यातील करजी येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पुढे येत आहे. तेथून बेकायदा वाहतूक करणारा डंपर येथील महसूलने शनिवारी सायंकाळी 4 वाजता पकडला आहे. त्याला साडेतीन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या बाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वच ठिकाणी वाळू उत्खननाला बंदी आहे. असे असताना खेड-करजी येथून डंपरमधून 3 ब्रास वाळूची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती येथे मिळाली होती. त्यानुसार प्रांत कार्यालयाजवळ मंडल अधिकारी यू. एल. जाधव, प्रांत कार्यालयाचे प्रकाश सावंत यांनी हा डंपर अडवला. त्यावेळी त्यात वाळू असल्याचे स्पष्ट झाले. हा डंपर संदीप महादेव आग्रे हे चालवत होते. त्यांनी ही वाळू करजी येथील अजिंक्य मोरे यांच्याकडून आणल्याचे सांगितले. आग्रे यांना 3 लाख 51 हजार 200 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र तो अद्याप भरला गेला नसल्याचे सागण्यात आले. या कारवाईमुळे खेडमध्ये बेकायदा व्यवसाय करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

स्वच्छ वाळू

जप्त केलेली वाळू पूर्णपणे स्वच्छ आहे. त्यामुळे ती हातपाटीची नसून सक्शन पंपाने काढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे करजी येथे संक्शन पंप लावले आहेत की काय, याचा तेथील यंत्रणेला शोध घ्यावा लागणार आहे.