|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार

माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार 

ऑनलाईन टीम / पुणे :

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या 128 व्या पुण्यतिथीनिमित्त 28 नोव्हेंबर रोजी समता दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना कृष्णकांत कुदळे म्हणाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचा दिवस समता दिन म्हणून पाळण्यात येतो. यंदाचा समता दिन कार्यक्रम 28 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी साडेनऊ वाजता, समता भूमी, महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले पेठ, पुणे येथे होणार आहे. समतादिन कार्यक्रमानिमित्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रूपये एक लाख मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फुले-शाहू- आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यीतील विविध ठिकाणांहून येणाऱया समता ज्योतीचे स्वागत महात्मा फुले वाडा येथे केले जाणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, रवी सोनवणे, महानगर अध्यक्ष प्रितेश गवळी, महानगर अध्यक्ष मंजिरी धाडगे, रघुनाथ ढोक, पंढरीनाथ बनकर, शिवराम जांभुळकर, सुनीता शेलवंते, अविनाश चौरे यांनी यावेळी केले.