|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासळी आयातबंदीला स्थगिती द्यावी

मासळी आयातबंदीला स्थगिती द्यावी 

कर्नाटकची गोव्याकडे मागणी कुमारस्वामींचे पर्रीकरांना पत्र

प्रतिनिधी/ पणजी

गोवा आणि कर्नाटक दरम्यान होणारी मासळी वाहतूक आणि मासळी व्यवसायाला मान्यता द्यावी अशी मागणी करणारे पत्र कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लिहिले आहे. मासळी आयात बंदीचा आदेश स्थगित ठेवावा, अशी मागणीही केली आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री विश्वजित राणे यांनी हे होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कर्नाटकचे मच्छीमार मागील अनेक दशकापासून शेजारील राज्यामध्ये मासळी पुरवण्याचा व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून गोव्याच्या चेक नाक्यावरुन मासळीचे अनेक ट्रक परत पाठविल्याचे मच्छीमारानी स्पष्ट केल्याचे या पत्रात कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. फॉर्मेलिनचा वापर व गोवा सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी नसल्याने हे ट्रक परत पाठविले जात आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया होईपर्यंत बंदी स्थगित ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अचानकपणे मासळी आयातीवर बंदी घातल्याने कर्नाटकातील मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. उत्तर कन्नडा, दक्षिण कन्नडा आणि उडुपी या भागातून मोठय़ा प्रमाणात मासळी उत्पादन होते. ही मासळी बर्फात मिसळून गोवा, केरळ, महाराष्ट्रामध्ये पाठविली जाते. या व्यवसायावर कर्नाटकातील मच्छीमार अवलंबून आहेत. त्यामुळे गोवा सरकारने आयातबंदी स्थगीत ठेवावी अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील मच्छीमार गोवा सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे आवश्यक ती कागदोपत्री पूर्तता करतील, असेही पत्रात स्पष्ट केले आहे.