|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयटी पार्क विरोधात चिबंलवासियांचा एल्गार

आयटी पार्क विरोधात चिबंलवासियांचा एल्गार 

प्रतिनिधी/ पणजी

चिंबल येथील आयटी पार्क चिंबलवासीयांच्या हितासाठी नाही. आयटी पार्क म्हणजे ही जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठी कमाई करण्याचा काही मंत्र्यांचा डाव आहे, असा आरोप करुन मंत्र्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ‘जिंकू किंवा मरु’च्या धर्तीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काल रविवारी झालेल्या ग्रामस्थांच्या जाहीरसभेत देण्यात आला. या सभेत सर्वच वक्त्यांनी माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांच्यावर चौफेर टीका केली.

  चिंबल येथील चिंबल ग्राम सेवा कला आणि संस्कृतिक मंच यांच्यातर्फे आयटी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

 व्यासपीठावर माजी मंत्री श्रीमती विक्टोरिया फर्नांडिस, आप पक्षाचे अध्यक्ष एल्विस गोम्स, रुडॉल्फ फर्नांडिस, निमंत्रक स्मिता शिरोडकर, एनजीओच्या तारा केरकर, प्रा. प्रजल साखरदांडे, रामा काणकोणकर, गोविंद शिरोडकर, आर्थुर डिसोझा, सायमन कायादो, व इतर मान्यवर उपस्थित होते.

 चिंबलची एकता हीच मोठी शक्ती : व्हिक्टोरिया

  चिंबल गावातील लोकांमध्ये नेहमीच एकता दिसून आली आहे. हीच एकता आमची शक्ती आहे. याच्या जोरावर आपण कोणतेही काम साध्य करु शकतो. आयटी पार्क कुठल्याच दिशेने आमच्या लोकांच्या हिताचे नाही आहे. त्यामुळे आयटी पार्कसारखे प्रकल्प आम्ही होऊ देणार नाहीत. यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, असे माजी मंत्री व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी सांगितले.

 प्रवीण चोडपडेकरच्या मारहाणीचा निषेध

  आताचे लोक शिकलेले आहेत. त्यांना कोणीही फसवू शकत नाहीत. त्यामुळे चिंबल येथे कुणाची डाळ शिजणार नाही, हे कळल्यावर ते गुंडगिरीची भाषा करत आहे. गुंड पाठवून प्रविण चोपडेकर यांना यांना जी मारहाण करण्यात आली तिचा आम्ही निषेध करत आहोत, असे फर्नांडिस पुढे म्हणाल्या.

 चिंबलच्या अस्तित्वाचा प्रश्न समजून लढा : गोम्स

 हा प्रकल्प उभा राहिला तर नंतर अनेक प्रकल्प येत गावाची जी मूळ ओळख आहे ती बदलणार आहे. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभिर्यांनी घेतला पाहिजे. हा लढा प्रत्येक चिंबलवासीयांनी आपल्या अस्तित्वाचा लढा समजून लढले पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो, असे एल्विस गोम्स यांनी सांगितले.

 आयटी पार्क पर्वरीत करुन दाखवावे : केरकर

  गावांगावांमध्ये प्रकल्पाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली जमीन हडपण्याचे कारस्थान सरकारमधील मंत्र्यांनी चालविले आहे. भाजप पक्ष आता सर्वसामान्यांचा पक्ष राहिलेला नाही. या सरकारने कुणालाही घरांत शांतपणे बसायला दिलेले नाही. प्रत्येकाला आता सरकार विरोधात रस्त्यावर यावे लागत आहे. लोकांना जगण्यासाठी लागणाऱया मुलभूत सुविधा मिळत नाहीत, तर मग आयटी पार्क सारख्या प्रकल्पाचा काय फायदा होणार आहे. मंत्री खंवटे यांना आयटी पार्क करण्याची एवढीच हौस आहे तर पर्वरी येथे करुन दाखवावी, असे आव्हान तारा केरकर यांनी दिले.

 यावेळी अनेकांनी आपली मते व्यक्त केली.