|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 57 वर्षांनी कतारचा ओपेकला रामराम

57 वर्षांनी कतारचा ओपेकला रामराम 

भारतावर फारसा प्रभाव पडणार नाही :

वृत्तसंस्था/ दोहा

तेल निर्यातदार देशांची संघटना ओपेकमधून कतार 1 जानेवारी रोजी बाहेर पडणार आहे. कतारचे ऊर्जामंत्री साद अल-काबी यांनी सोमवारी या निर्णयाची घोषणा केली आहे. हा राजकीय नव्हे तर तांत्रिक तसेच धोरणात्मक निर्णय आहे. कतार नैसर्गिक वायू उत्पादनाचे प्रमाण वार्षिक 77 दशलक्ष टनांवरून वाढवत 110 दशलक्ष टनावर नेऊ इच्छितो. या योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद काबी यांनी केला आहे.

युरोपीय देशांनी कतारमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. कतारच्या माध्यमातून ओपेकमध्ये स्वतःचा विस्तार घडवून आणण्याचा उद्देश युरोपीय देशांनी बाळगला होता. अशा स्थितीत कतार ओपेकमधून बाहेर पडल्यास या देशांना काही प्रमाणात आर्थिक नुकसान झेलावे लागू शकते. याचा जागतिक अर्थव्यवस्थेला देखील काहीअंशी झटका बसू शकतो.

आतापर्यंत कतारच्या तेल उत्पादनावर ओपेकचे नियंत्रण होते, परंतु आता ओपेकचे सदस्यत्व सोडल्यानंतर कतार कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवून भारतासह अन्य देशांमधील निर्यात वाढवू शकतो. अशा स्थितीत त्याचे तेलरोखे आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत येऊ शकतात. याचा कतारच्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ होणार आहे.

कतार हा मध्यपूर्वेतील मोठी अर्थव्यवस्था धारण करणारा देश आहे. कतारने अंग काढून घेतल्यास तेलाच्या दरांबद्दल असलेली ओपेकची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते. ओपेकचे सदस्य देश उत्पादन वाढविण्याचा किंवा घटविण्याचा निर्णय एकत्रितपणे घेत असतात.

कतारच्या निर्णयाचा भारतावर फारसा प्रभाव पडणार नाही. भारताला इराक, सौदी अरेबिया आणि इराणकडूनच प्रामुख्याने कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. संयुक्त अरब अमिरातचा कच्च्या तेलाच्या पुरवठय़ात चौथा क्रमांक लागतो. कच्च्या तेलाच्या व्यतिरिक्त भारताचे कतारसोबत फारसे व्यापारी संबंध देखील नाहीत. परंतु अमेरिकेच्या निर्बंधांपोटी भारताला भविष्यात इराणकडून होणारी आयात कमी करावी लागल्यास कतारकडून तेलखरेदीचा पर्याय निवडता येणार आहे.

नैसर्गिक वायूवर भर

कतार द्रव्यीकृत नैसर्गिक वायूचा (एलएनजी)  जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. जगभरातील नैसर्गिक वायू उत्पादनात कतारची 30 टक्के हिस्सेदारी आहे. नैसर्गिक वायूप्रकरणी जागतिक बाजारातील स्वतःचे वर्चस्व कायम रहावे अशी कतारची इच्छा आहे.

कच्चे तेल उत्पादन

ओपेकमधून बाहेर पडल्यानंतर कतार कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविणार असल्याचा कयास वर्तविला जातोय. कतार हा ओपेकचा 11 वा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. कतारने ऑक्टोबर महिन्यात प्रतिदिन 6.10 लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले होते. कतार मागील 57 वर्षांपासून म्हणजेच 1961 पासून ओपेकचा सदस्य होता.

निर्णयाची पार्श्वभूमी

कतारने हा मोठा निर्णय 6 डिसेंबर रोजी होणाऱया ओपेक देशांच्या बैठकीपूर्वी घेतला आहे. या संघटनेतूत बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा कतार हा पहिला देश ठरणार आहे. कतारचे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बहारीन आणि इजिप्त यासारख्या शेजारी देशांसोबतचे संबंध सातत्याने बिघडत चालले आहेत. या देशांनी दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप करत कतारसोबतचे संबंध स्थगित केले आहेत.