|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » खशोगी हत्येमागे ‘इस्रायल कनेक्शन’?

खशोगी हत्येमागे ‘इस्रायल कनेक्शन’? 

हत्येपूर्वी पाळत ठेवण्याचा प्रकार : इस्रायलच्या कंपनीविरोधात तक्रार

वृत्तसंस्था/ तेल अवीव

अमेरिकेच्या वृत्तपत्रात स्तंभलेखन करणारे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्याप्रकरणात आता इस्रायलचे कनेक्शन समोर आले आहे. खशोगी यांच्या एका मित्राने इस्रायलच्या टेहळणी कंपनीच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. आपल्या मित्राच्या हत्येत या कंपनीच्या हेरगिरीच्या उपकरणाची मदत घेण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.

तेल अवीव न्यायालयात दाखल खटल्यापूर्वी देखील कंपनीच्या विरोधात खटला भरण्यात आला आहे. नवा खटला दाखल करणाऱया क्यक्तीचा संबंध खशोगीशी असल्याने त्याने इस्रायलची कंपनी आणि तेथील सरकारबद्दल चर्चा सुरू केली आहे. टेहळणी तंत्रज्ञानाच्या निर्यातीला परवाना दिल्याने त्याने सरकारला देखील आरोपी ठरविले आहे.

सौदीच्या राजघराण्याचे टीकाकार तसेच कॅनडाचे रहिवासी उमर अब्दुल  अजीज यांनी आपण खशोगींचे मित्र असून त्यांच्यासोबत काम केल्याचे म्हटले आहे. आपल्याला एक लिंक मिळाली, ज्याच्या माध्यमातून खशोगींच्या मोबाईलवर झालेल्या संभाषणाचा तपशील सौदी अधिकाऱयांना प्राप्त झाला होता. या संभाषणानंतरच सौदी अधिकाऱयांनी खशोगी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केल्याचा दावा अजीज यांनी केला आहे.

एनएसओ ग्रूपने सौदी अरेबियाला 5.5 कोटी डॉलर्समध्ये हे तंत्रज्ञान विकले होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच खशोगी यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याने कंपनीने नुकसान भरपाईदाखल 1.6 लाख डॉलर्स द्यावेत अशी मागणी अजीज यांनी केली आहे.

कंपनीची भूमिका

तंत्रज्ञान सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद आणि गुन्हय़ांच्या विरोधात लढण्यास मदत करते. आम्ही स्वतःची उत्पादने विकण्यासाठी अत्यंत सतर्कतेने निर्णय घेतो, इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने परवाना दिलेली उत्पादनेच विकली जातात. आम्ही आमच्या उत्पादनाचा गैरवापर सहन करत नाही. चुकीच्या वापराचा संशय निर्माण झाल्यास आम्ही तपास करून योग्य कारवाई करतो. यात करार रद्द करण्याचे पाऊल देखील सामील असल्याचे एनएसओ ग्रूपने लेखी स्वरुपात म्हटले आहे.