|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नौदलात दाखल होणार 56 लढाऊ युद्धनौका

नौदलात दाखल होणार 56 लढाऊ युद्धनौका 

पाणबुडय़ांचाही समावेश : 32 अतिरिक्त लढाऊ जहाजे : नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नौसेनेची क्षमता वाढविण्यासाठी 56 लढाऊ जहाजे आणि पाणबुडय़ा दाखल करण्याची योजना असून त्याचबरोबर विमानवाहू युद्धनौका आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी दिली.  नौसेनेच्या या योजनेअंतर्गत 56 लढाऊ युद्धनौका आणि पाणबुडय़ा समाविष्ट होणार आहेत. सागरतटाची सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नाव्यतिरिक्त मासेमारी करणाऱया सुमारे दीड लाख नौकांवर स्वयं ओळख करणारी ट्रान्सपोर्डर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ऍडमिरल लांबा यांनी सांगितले.

पाच ऑफशोर गस्ती वाहनांसाठी रिलायन्स नेवल इंजिनिअरींग लिमिटेडशी करार करण्यात आला आहे. नौसेना 2008 पासून भारतीय लढाऊ जहाजांच्या मदतीने 3 हजार 440 पेक्षा जास्त जहाजे आणि त्या जहाजांवरील 25 हजार प्रवाशांना वाचविण्यात यशस्वी झाली आहे, असे लांबा यांनी सांगितले.

मच्छिमारांच्या बोटींवर ट्रान्सपोर्डर बसविणार

मच्छिमारांच्या सुमारे अडीच लाख बोटींवर स्वतः ओळख पटवणारे ट्रान्सपोर्डर लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहितीही लांबा यांनी दिली. अदनच्या खाडीत जहाजांच्या लुटारूंपासून बचावासाठी भारत, चीन या देशांसह 32 देशांची नौदले संयुक्त टेहळणी करीत आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस त्रिशूलने भारताच्या कार्गो जहाजाला लुटण्यापासून वाचवले होते, असे लांबा म्हणाले.

भर समुद्रात नौसैनिकांची यशस्वी झुंज

भारतीय नौदलाने गेल्या दहा वर्षांत समुद्री चाच्यांकडून होणाऱया जहाजांच्या लुटीचे 44 प्रयत्न हाणून पाडले आहेत. तर 120 दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याचेही नौदलप्रमुखांनी सांगितले. भारतीय नौदल समुद्री सीमांचे दिवस-रात्र मेहनत घेत यशस्वी झुंज देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नौसैनिकांची क्षमता आणखी वाढवण्यासाठी युद्धनौका आणि पाणबुडय़ांचा समावेश करण्याचा विचार नौदल करीत आहे.

कुलभूषण कुटुंबियांना मदतीची तयारी

पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना आवश्यक मदत त्यांना पुरवित आहोत, असेही लांबा यांनी स्पष्ट केले.  तसेच अमेरिकी पर्यटक जॉन एलेन चाऊ याची अंदमानमध्ये झालेल्या हत्याप्रकरणी बोलताना चाऊ हे अंदमान आणि निकोबर बेटांवर एक पर्यटक म्हणून आले होते. त्यांच्याकडे तिथे जाण्याचा परवानाही होता. या प्रकरणाचा तपास अंदमान-निकोबर पोलीस करीत आहेत, असे लांबा म्हणाले.