|Sunday, April 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 25 कोटी, मंत्रिपदाचे आमिष

25 कोटी, मंत्रिपदाचे आमिष 

ऑपरेशन कमळ’ भाजपचा पुन्हा आटापिटा सुरू : ध्वनीफित व्हायरल झाल्याने खळबळ

प्रतिनिधी / बेंगळूर

भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’च्या तयारीमुळे काँग्रेस गटात खळबळ उडाली आहे. बेळगाव येथील विधीमंडळ अधिवेशनापूर्वी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार पाडण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. काँग्रेस पक्षातील आमदारांना प्रत्येकी 20 ते 25 कोटी रुपये आणि मंत्रिपद देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. भाजप नेते बी. श्रीरामुलू यांच्या स्वीय साहाय्यकाने दुबई येथील उद्योजकाशी केलेल्या संभाषणाची ध्वनीफित व्हायरल झाली आहे.

गुप्तचर विभागामार्फत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यापर्यंत ध्वनीफित पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा करून तुमच्या पक्षातील आमदारांवर लक्ष ठेवा, असा संदेश पोहोचविला आहे. काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी, आनंद सिंग यांच्यासह अनेकजण भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्या दिशेने पावले उचलावीत, असा संवाद श्रीरामुलू यांच्या स्वीय साहाय्यकाने साधल्याची ध्वनीफित व्हायरल झाली आहे.

काँग्रेस-निजद युतीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन कमल राबविण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने येत आला आहे. दरम्यान, ध्वनीफित व्हायरल झाल्याने राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे. बेळगाव येथे 10 डिसेंबरपासून विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. तत्पूर्वीच काँग्रेसमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या असंतुष्ट आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता प्रत्येक आमदाराला 20 ते 25 कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. यासंबंधीची ध्वनीफित गुप्तचर विभागाने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्याने त्यांना धक्का बसला आहे.

उत्तर कर्नाटकातील प्रमुख नेत्यांच्या नावांचा उल्लेख झाल्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींनी राज्य काँग्रेस प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांना राज्यातील काँग्रेस आमदारांवर लक्ष्य ठेवण्याची सूचना दिल्याचे समजते. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राज्य राजकारणात पुन्हा हायड्रामा सुरू झाला आहे.

सिद्धरामय्या संधीसाधू राजकारणी : ईश्वरप्पा

सिद्धरामय्या संधीसाधू राजकारणी आहेत. त्यांना संधी मिळाल्यास कोणत्याही पक्षात उडी घेतात. मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यास ते भाजपमध्येही येतील, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केली. निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितल्यानंतर ते स्वार्थासाठी पुन्हा निवडणूक लढवितात. इच्छा असेल तर सिद्धरामय्या यांना भाजप प्रवेशाची दारे खुली आहेत. भाजप पक्ष गंगेप्रमाणे असून त्यांची पापे धुवून काढण्यात येतील, असा टोला त्यांनी हाणला.

Related posts: