|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मडुऱयात रेल्वेच्या धडकेने मगर जखमी

मडुऱयात रेल्वेच्या धडकेने मगर जखमी 

ट्रकपर्यंत मगर पोहोचली कशी? : ग्रामस्थांमध्ये घबराट

वार्ताहर / बांदा:

 मडुरा माऊली मंदिरनजीक कोकणे रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत एक मगर गंभीर जखमी झाली. पोलीस पाटील नितीन नाईक यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. मगरीला पकडून सावंतवाडी येथे उपचार केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. नदी तिरापासून कोकण रेल्वे टँकरपर्यंत मगर पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सकाळी मगर रेल्वे ट्रकवर आढळल्याने ग्रामस्थांत प्रथम घबराट पसरली होती

 बुधवारी सकाळी कोकण रेल्वे मार्गावर जखमी स्थितीतील मगर स्थानिकांच्या निदर्शनास आली. सुमारे सात फूट लांब असलेल्या मगरीच्या तोंडाला जबर दुखापत झाली होती. शिवाय शेपटाचा भाग तुटून पडला होता. जखमी अवस्थेमध्ये सापडून आलेल्या मगरीबाबत ग्रामस्थांनी मडुरा पोलीस पाटील नितीन नाईक यांना माहिती दिली. नाईक यांनी वन विभागाचे आजगाव वनपाल अमित कटके व पाडलोस वनरक्षक विशाल पाटील यांना माहिती दिल्यानंतर सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.

 वनमजूर चंद्रकांत पडते व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मगरीला पकडून सावंतवाडी येथे नेण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. वाघ यांनी मगरीवर उपचार केले. मगरीचा डावा डोळाही निकामी झाला आहे. उपचारानंतर मगरीला सुरक्षितस्थळी निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आल्याचे वन अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. याही अवस्थेत मगरीला पकडण्यासाठी ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने जमवाजमव करावी लागली. यामध्ये नारायण सोमा परब, सुशांत केरकर, दाजी नाईक यांनी सहकार्य केले. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा परब, प्रकाश सातार्डेकर, संदीप परब, संतोष केरकर, आनद नाईक, दाजी सातार्डेकर, सोमनाथ परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 गेल्या काही वर्षांमध्ये मडुरा गावामध्ये मगरींची संख्या वाढली आहे. जागोजागी असणाऱया पाणथळ भागामध्ये आढळणाऱया मगरींमुळे भीतीचे वातावरण आहे.