|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळात महामार्गाच्या कामाला सुरुवात

कुडाळात महामार्गाच्या कामाला सुरुवात 

झाडे तोडणे, साफसफाई, मोऱया बांधण्याची कामे हाती

प्रतिनिधी / कुडाळ:

 मुंबई-गोवा महामार्गाच्या कुडाळ शहरातील कामाला धिम्या गतीने का असेना आता सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूची झाडे तोडणे, अन्य साफसफाई करणे, मोऱया बांधण्याचे काम, वीज खांब बाजूला उभारणे आदी कामे सुरू करण्यात आली आहेत. मोठमोठी झाडे तोडल्याने महामार्गाचे काम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कुडाळ आगाराकडील बॉक्सवेल व ‘भंगसाळ’च्या नवीन पुलालगतच्या जोडरस्त्याच्या कामाला अद्याप वेग आलेला नाही.

 गेल्या आठ दिवसांपासून ठेकेदाराने झाडे तोडण्यास सुरूवात केली. नाडकर्णी दुकान, गणेशमूर्ती शाळा तसेच हॉटेल सत्यम् परिसरातील झाडे तोडण्यात येत आहेत. आगारानजीक नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचे तसेच मोरीच्या पाईपलाईनचे कामही हाती घेण्यात आले आहे.

 कुडाळ एस. टी. आगाराकडून बॉक्सवेलचे काम धिम्या गतीने सुरू आहे. शहरातील सर्व्हिस रोडचेही काम अद्याप हाती घेण्यात आले नाही. मात्र, मोजमाप घेणे, अंतराचे मार्किंग करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. लवकरच सपाटीकरण व अन्य मोऱयांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.