|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्यनाटय़ स्पर्धेत सांगली केंद्रातून ‘पुस्तकाच्या पानातून’ ची बाजी

राज्यनाटय़ स्पर्धेत सांगली केंद्रातून ‘पुस्तकाच्या पानातून’ ची बाजी 

प्रतिनिधी/ सांगली

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 58 व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत सांगली केंद्रातून नवरंग सांस्कृतिक कलामंच, सांगली या संस्थेच्या ‘पुस्तकाच्या पानातून’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सांगली केंद्रावरील अन्य निकाल सविस्तर पुढील प्रमाणे आहेत. हेल्पींग बडीज् फाऊंडेशन, सांगली संस्थेच्या ‘लोककथा 78’ या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि सांगली शिक्षण संस्था, सांगलीच्या ‘रणांगण’ या नाटकास तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक संदिप जंगम (लोककथा 78), द्वितीय अपर्णा गोसावी(पुस्तकाच्या पानातून), प्रकाश योजनेसाठी प्रथम सुनिल पाटील (पुस्तकाच्या पानातून), द्वितीय शशांक लिमये (रणांगण), नेपथ्यामध्ये प्रथम मोहन दिंडे (पुस्तकाच्या पानातून), द्वितीय धनंजय जोशी (अज्ञाताचा प्रवास), रंगभूषेसाठी प्रथम व द्वितीय दोन्हीही क्रमांक प्रसाद गदे यांना अनुक्रमे रणांगण व मारुतीच्या पायरीवरचं प्रेमप्रकरण या नाटकासाठी मिळाली.

तर उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक आदित्य जोशी (पुस्तकाच्या पानातून) व प्रज्ञा सुर्यवंशी (ग्रेसफुल) यांना मिळाले. तसेच अभिनयासाठीची गुणवत्ता प्रमाणपत्रे मौसमी पटवर्धन (पुस्तकाच्या पानातून), दिपेंती चिकणे (अपुर्ण वर्तुळ), मानसी बरगाले (धुआँ), मयुरी जाधव (नाच्यौ बहुत गोपाल), शिवराज नाळे (लोककथा 78), प्रितम जोशी (रणांगण) व मयुर पाटील (नंगी आवाजें) यांना जाहीर झाली.

 या स्पर्धा 15 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत बालगंधर्व नाटय़गृह, मिरज येथे झाल्या. यामध्ये एकूण 19 संस्थांनी भाग घेतला होता, त्यापैकी 17 नाटय़प्रयोग सादर झाले. यासाठी परीक्षक म्हणून राहुल वैद्य, सुभाष भागवत व श्रीमती मालती भोंडे यांनी काम पाहिले. वरील सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.