|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नलावडे-पारकर गटात ‘राडा’

नलावडे-पारकर गटात ‘राडा’ 

कणकवलीत तणाव : भाजप-स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने-सामने

वार्ताहर/ कणकवली

कणकवली नगर पंचायत निवडणुकीच्या वादातून स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजपचे संदेश पारकर समर्थकांच्या दोन गटांत बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भर बाजारपेठेत जोरदार राजकीय राडा झाला. पारकर गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्वाभिमानचे समर्थक असलेल्या कॉलेजमधील दोन युवकांना मारहाण करीत त्यांच्या ग्रुपमधील काहींच्या दुचाकींची कणकवली कॉलेजच्या मैदानात नासधूस करण्यात आली. त्यानंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संदेश पारकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या काही दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर कन्हैया पारकर हे देखील पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. त्यानुसार परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून नगराध्यक्ष समीर नलावडे, तीन विद्यमान नगरसेवकांसह इतरांवरही गुन्हा दाखल झाला आहे. या राजकीय राडय़ामुळे कणकवलीतील वातावरण तणावपूर्ण होते. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

मारहाण झालेल्या शहरातील दोघा कॉलेज युवकांपैकी एका युवकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘त्या दोघांना कॉलेजच्या मैदानावर तुम्ही नगर पंचायत निवडणुकीत स्वाभिमानचे काम केलंत. तुम्हाला मारणार’, असे सांगत पारकर गटाच्या आदित्य सापळे, ऋषी वाळके, गौरव सरुडकर, योगेश कोरगावकर, राहुल पेटकर, अक्षय घुरसाळे, तेजस नार्वेकर, शुभम पेडणेकर आदींच्या 25 ते 30  जणांच्या जमावाने आपणास व भावेश कमलाकर निग्रे (20, भालचंद्रनगर, कणकवली) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानुसार भा. दं. वि. कलम 143, 147, 149, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडय़ांच्या तोडफोडीची तक्रार

कन्हैया भास्कर पारकर (44, कणकवली बाजारपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते घराजवळ उभे असताना स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जमाव आला. या जमावाने मागील भांडणाचा राग धरून हातात लाठय़ा, काठय़ा घेऊन घरासमोरील दुचाकींची तोडफाड, शिवीगाळ करीत अंगावर धावून आले. त्यानुसार कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू हर्णे, संजय कामतेकर तसेच किशोर राणे, संदीप नलावडे, स्वाभिमान शहराध्यक्ष राकेश राणे, राजा पाटकर, युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्राr, निखील आचरेकर, जावेद शेख, पंकज पेडणेकर, विजय इंगळे आदींवर भा. दं. वि. 143, 147, 149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच दुपारी कणकवलीत दाखल झालेले अप्पर पोलीस अधीक्षक निमीत गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक हे सायंकाळपर्यंत कणकवलीत ठाण मांडून होते. तर शीघ्र कृती दलही पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते.

सुरुवातीला कणकवली कॉलेज मैदानावर भिडले

दाखल फिर्यादीनुसार, अकरावीमध्ये शिकत असलेले भावेश निग्रे व तो युवक कॉलेजमधून बाहेर येत असताना तेथील शिवारा मंदिराजवळ उभ्या असलेल्या आदित्य सापळे व त्याच्या अन्य सहकाऱयांनी अडवून न. पं. निवडणुकीत स्वाभिमानचे काम केलात म्हणून तुम्हाला मारणार, असे सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली. गौरव सरुडकर याने त्यातील एकाच्या कॉलरला पकडले व योगेश कोरगावकरने पाठीवर लाथ मारली. त्यानंतर तेथे जमलेल्या त्यांच्या सहकाऱयांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. या मारहाणीत त्या दोन युवकांना किरकोळ जखमा झाल्या. मारहाण झालेल्यातील एकाचे डोके पकडून तेथील दुचाकीवर आपटण्यात आल्याचे सांगण्यात आले.

त्या दोघांनी वेधले स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांचे लक्ष

मारहाण झालेल्या त्या दोघांनी ही बाब न. पं. मध्ये जात नगराध्यक्ष समीर नलावडे व पदाधिकाऱयांच्या कानी घातली. त्यावेळी नगराध्यक्षांसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते काही वेळातच संदेश पारकर यांच्या घराच्या दिशेने चाल करून गेले. तेथे उभ्या असलेल्या दुचाकींना लक्ष करून त्यांची नासधूस करण्यात आली. या दुचाकींचे तुटलेले साहित्य रस्त्यावर पडलेल्या स्थितीत होते.

चौकात स्वाभिमान कार्यकर्ते एकवटले

घटनेची माहिती मिळताच येथील कंझ्युमर्स सोसायटीनजीक स्वाभिमानचे शेकडो कार्यकर्ते गोळा झाले होते. कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह दंगल नियंत्रण पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भाजप नेते संदेश पारकर यांच्या घरासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

शांतता बिघडू नये म्हणून गप्प होतो!

नलावडे म्हणाले, न. पं. निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पराभूत झाल्यामुळे संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. आम्ही शहरातील शांतता बिघडू नये म्हणून गप्प होतो. मात्र आता दशहत खपवून घेणार नाही. गेली दहा वर्षे शांत असलेली कणकवली अशांत करण्याचा पारकर गटाचा प्रयत्न आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या गाडय़ा पारकर समर्थकांनी फोडल्याने जशास तसे प्रत्युत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिले. रात्रीच्या वेळी घोळक्याने कुणाचे कार्यकर्ते शहरात असतात, त्याची चौकशी करून कारवाई करा.

पोलीस स्थानकात येण्याचे पोलिसांचे आवाहन

पोलीस निरीक्षक कोळी यांनी, तुमची जी तक्रार आहे, ती घेतली जाईल. पण शांतता राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले. त्यावेळी दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र नलावडेंनी आम्ही आरोपी नाही. पोलिसांना सहकार्य करू. मात्र आम्ही कार्यकर्त्यांसह चालत पोलीस स्टेशनमध्ये येणार असे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, विराज भोसले, राकेश राणे, किशोर राणे, संदीप मेस्त्राr, पं. स. सदस्य मिलींद मेस्त्राr आदींसह शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाले.

आमदार नाईक यांची पारकर निवासस्थानी भेट

घटनेची माहिती मिळताच आमदार वैभव नाईक यांनी संदेश पारकर यांच्या घराजवळ भेट देत कन्हैया पारकर यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. पारकर म्हणाले, स्वाभिमानचे कार्यकर्ते जमाव करून आपल्या घरावर चाल करून आले. त्यांच्याकडे दांडे, शिगा असे साहित्य होते. त्यांना पाहून काही कार्यकर्ते मागच्या बाजूला गेले. मात्र तोपर्यंत याबाबत मला घटनेची काहीच माहिती नव्हती.

स्वाभिमानचे कार्यकर्ते पोलीस स्थानकात

ढालकाठी-तेलीआळी चौकातून स्वाभिमानचे कार्यकर्ते चालत जात पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपली बाजू पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासमोर मांडली. त्यानंतर काही वेळाने कन्हैया पारकर, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल, रुपेश नार्वेकर, महेश सावंत, अवधूत मालणकर, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांची फिर्याद घेत असतानाच जिल्हाभरातून पारकर व भाजप कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

सीसीटीव्हीत ‘फुटेज’ नाही!

या घटनेबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, ज्या ठिकाणी दुचाकींची तोडफोड करण्यात आली, त्या ठिकाणी असलेली काही सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आली आहेत. मात्र सदर घटनेचे फुटेज या सीसीटीव्हेंच्या कक्षेत आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानची दादागिरी खपवून घेणार नाही!

आमदार वैभव नाईक म्हणाले, स्वाभिमानची दहशत जिल्हय़ात चालू देणार नाही. विकासकामे करण्याची स्वाभिमानमध्ये धमक नाही. आपल्यापेक्षा कुणी मोठा होता नये, ही स्वाभिमान कार्यकर्ते व नेत्यांची भूमिका असून याबाबत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येईल. यावेळी राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

  बाका प्रसंग टळला

  पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा सुरू असताना अभिजीत मुसळे यांनी पारकर यांचे कार्यकर्ते आमच्या गाडय़ा फोडण्यासाठी नगर पंचायती जवळ गेले आहेत, असे सांगितले. त्यावेळी स्वाभिमानचे सर्वच कार्यकर्ते पोलीस स्थानकातून उठत ‘आता काय ते होऊ देत. जशास तसे उत्तर द्यायच़े’ असे सांगत आक्रमक होत चालतच मुख्य चौकातून बाजारपेठेमार्गे न. पं. च्या दिशेने जात होते. मात्र झेंडाचौकात कार्यकर्ते आल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडेंनी बाजारपेठेतून न जाता कार्यकर्त्यांना तेलीआळी मार्गे नगर पंचायतीकडे चला, असे सांगितले. त्यावेळी जर बाजारपेठेतून कार्यकर्त्यांचा जमाव गेला असता, तर संदेश पारकर यांच्या घरानजीक कार्यकर्त्यांकडून हुल्लडबाजी होऊन तेथे पुन्हा राडा घडण्याची शक्यता होती. मात्र बाका प्रसंग टळला.

 

   माझ्या घरावरील हल्ला हा नियोजित कटच : संदेश पारकर

  या घटनेच्या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेले चार दिवस मी मांडलेली भूमिका ही राणेंना झोंबली असल्यानेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाठय़ा-काठय़ा, शिगा, हत्यारे घेऊन हा हल्ला करण्यात आला. एकाच वेळी 100 हून कार्यकर्ते कसे जमले?, अपघाताने काही पदाधिकारी झाले. मात्र त्यांनी आपली मूळ भूमिका दाखवून दिली. हा कणकवली शहरातील जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्याचा प्रकार आहे. अशा पदाधिकाऱयांची तडिपारी व्हायला हवी. बुधवारी माझ्या घरावर केलेला हल्ला हा भ्याड आहे. राणेंकडूनच हे नियोजन करून माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी भाडोत्री गुंडांना पाठविण्यात आले. यापूर्वी मुंबईहून येणारे गुंड जिह्यातच तयार करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. नारायण राणे हे दोनवेळा निवडणुकीत पराभूत झाले. मुलगा खासदारकीला पराभूत झाल्याने राणे अडगळीत पडले होते. मात्र भाजपमुळे त्यांना अच्छे दिन आले. येत्या लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने राणे बिथरले असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे. अशाप्रकारच्या दहशतवादाला यापूर्वीही आम्ही पुरून उरलो असून या भ्याड हल्ल्याला आम्ही न घाबरता अखेरपर्यंत लढा देणार, असे भाजप नेते संदेश पारकर यांनी म्हटले आहे.

   गाडय़ांची नासधूस पाहून पारकरांच्या पत्नीला चक्कर

  स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून पारकर यांच्या घराकडे चाल करून दुचाकी फोडण्यात आल्या. त्यावेळी तेथे सुरू झालेल्या आरडाओरडीमुळे कन्हैया पारकर तसेच त्यांची पत्नी सौ. कृपा पारकर तेथे घरातून धावत आल्या. मात्र समोर लाठय़ा- काठय़ांनी गाडय़ांच्या तोडफोडीचा सुरू असलेला हा सारा प्रकार पाहून कृपा पारकर यांना  चक्कर आल्याने त्या तेथेच खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते.