|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » निर्बिजीकरणावर लाखो खर्च करूनही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत भरच…

निर्बिजीकरणावर लाखो खर्च करूनही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत भरच… 

 

प्रसाद नागवेकर/ मडगाव

मडगाव पालिकेकडून मागील दीड-दोन दशकभरापेक्षा जास्त काळापासून पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. लाखो रुपये खर्च करून हजारो कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याचे पालिकेच्या कागदोपत्री आढळून येते. मात्र तरीही या शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलेलीच दिसत असल्याने खरेच निर्बिजीकरण होत आहे काय याबद्दल साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

मडगाव पालिकेने विविध बिगरसरकारी संघटनांचा आधार घेऊन भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सदर मोहीम मागील कित्येक वर्षांपासून चालू ठेवली आहे. प्रारंभी काही संघटनांनी ही मोहीम राबवून त्यातून काढता पाय घेतला. सध्या कार्यरत असलेल्या बिगरसरकारी संघटनेकडून निर्बिजीकरणाचे काम मागील सात वर्षांपासून चालू असल्याची माहिती पालिकेच्या सेनिटरी विभागाने दिली.

मागील सात वर्षांत महिन्याकाठी किमान शंभर भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याचा अहवाल या संघटनेकडून पालिकेला सादर करण्यात आलेला आहे. मागील सात वर्षांत सुमारे साडेचार हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात येते वा कागदोपत्री तसे आढळून येते. मात्र या पालिका क्षेत्रात समाविष्ट होणाऱया मडगाव, फातोर्डा व कुडतरी मतदारसंघाच्या भागांमध्ये असलेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे साडेतीन-चार हजारांवरून सहा हजारांवर पोहोचल्याचे सांगण्यात येते. कुत्र्यांचे निर्बिजीकरण मागील दशकांमध्ये वेळोवेळी होत आलेले असले, तरी त्यांच्या संख्येत घट होण्याऐवजी ही संख्या वाढत गेलेली असल्याने पालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या बिगरसरकारी संस्था खरेच काम करतात की, अहवाल सादर करून पालिकेच्या तिजोरीतील पैसे गिळंकृत करतात, असा सवाल आता मडगाववासीय उपस्थित करत आहेत.

पालिकेकडून रकमेत भरीव वाढ

मडगावात रात्रीच्या वेळी नाक्यानाक्यावर कुत्र्यांचे कळप आढळून येतात. हे कळप वाहनांचा आणि खास करून दुचाकीस्वारांचा पाठलाग करत असल्याने कित्येकांना अपघात घडलेले आहेत. तसेच कुत्र्यांनी चावे घेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येते. मडगाव पालिकेकडून सध्याच्या बिगरसरकारी संस्थेला प्रारंभी 25 हजार रुपये महिन्याकाठी देण्यात येत होते. त्यात 40 हजार, नंतर 50 हजार व आता ऑक्टोबरपासून 70 हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

बिले थकल्याने कामास असमर्थता

अलीकडेच सदर बिगरसरकारी संस्थेने पालिकेला एक पत्र लिहून जानेवारी, 2018 पासून कामाचे पैसे देण्यात आले नसल्याने यापुढे काम करणे जमणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या संघटनेची बिले प्रमाणित करण्यास सेनिटरी निरीक्षक विराज आरबेकर यांनी नकार दिला होता. आपणास सोनसडो यार्डातील काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असल्याने आपण सदर बिले प्रमाणित करू शकत नाही, असे कारण त्यांनी पुढे केले होते.

देखरेख कोणाचीच नाही

पालिकेचे अन्य एक सेनिटरी निरीक्षक संजू सांगेलकर यांनी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम आपण पाहत नसल्याचे कारण पुढे केल्याने या संस्थेच्या पदाधिकाऱयांना बिलांसाठी पालिकेचे उंबरठे झिजवावे लागलेले आहेत. सेनिटरी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते, मात्र त्यावर देखरेख कोणी ठेवत नसतो. फक्त अमूक कुत्र्यांचे निर्बिजीकरण झालेले आहे एवढाच अहवाल या विभागाला सादर करण्यात येतो. त्याच्या आधारे बिले प्रमाणित करावी लागतात, असे तेथील एका अधिकाऱयाने नजरेस आणून दिले. खरेच कुत्र्यांचे निर्बिजीकरण होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असून जर ते होत असते, तर कुत्र्यांची संख्या कशी वाढत गेली असती हा प्रश्न चर्चेचा विषय बनलेला आहे, असे ते म्हणाले.

लक्ष घालणार : मुख्याधिकारी

संस्थेच्या थकलेल्या बिलांसंदर्भात मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांच्याशी विचारणा केली असता एक-दोन दिवसांत सदर बिले फेडली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. कुत्र्यांचे निर्बिजीकरण मागील दोन दशकांपासून होत असूनही कुत्र्यांची संख्या का घटत नाही याचा अभ्यास पालिकेने केला आहे काय अशी विचारणा केली असता आपण त्यात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: