|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संजीवनीत 160 मेट्रिक टन ऊस दाखल

संजीवनीत 160 मेट्रिक टन ऊस दाखल 

8 डिसेंबरपासून गळीत हंगामाची शक्यता

प्रतिनिधी/ धारबांदोडा

सांगे, केपे व सत्तरी तालुक्यातून अंदाजे 160 मेट्रिक टन ऊस संजीवनी साखर कारखान्यात बुधवार सायंकाळपर्यंत पोहोचला आहे. सत्तरी तालुक्यातून 4 तर सांगे व केपे तालुक्यातून 18 ट्रक भरुन ऊस आत्तापर्यंत कारखान्यात खाली करण्यात आला आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी संजीवनीच्या गळीत हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते.

प्राप्त माहितीनुसार साखर कारखाना सुरु करण्यासाठी किमान सुरुवातीला किमान 700 मेट्रिक टन उसाची आवश्यकता असल्याचे प्राथमिक चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर दिवसाकाठी सुमारे 1200 टन ऊसाची आवश्यकता भासणार आहे. यंदा गोव्यातून 45 हजार मेट्रीक टन ऊस पुरवठा होण्याची शक्यता असून शेजारील राज्यातूनही ऊस आणला जाईल, अशी माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी काल बुधवारी धारबांदोडय़ात येऊन संजीवनी साखर कारखान्याला भेट दिली. यंदाचा गळीत हंगाम, कारखान्याची स्थिती व अन्य विषयांवर त्यांनी कारखाना अधिकाऱयांशी चर्चा केली.