|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस 

प्रतिनिधी/ खानापूर

खानापूर तालुक्यात आज बुधवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील हवामान ढगाळ होते. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून नंदगड, हलशी, बेकवाड, झुंजवाड परिसरात दोन तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले.

आज नंदगडचा बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेतही गर्दी होती. पण अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. विक्रीसाठी आणलेला भाजीपाला देखील पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले. यापाठोपाठ खानापूर, चापगाव, हेब्बाळ कारलर्गे, सावरगाळी, गुंजी, गणेबैल परिसरातही मुसळधार पाऊस झाला.

तालुक्यात सध्या भात-मळणीचा हंगाम जोरात सुरू आहे. आज अचानक पडलेल्या पावसामुळे मळणी हंगामावरती मोठा परिणाम झाला. काहीठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे भाताच्या राशीदेखील वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱयांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले.

वीट व्यावसायिकांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान

खानापूर, नंदगड, कसबा नंदगड, हेब्बाळ, गणेबैल, इदलहोंड, अंकले परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीट उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. अनेक वीट व्यावसायिकांचा कच्चा माल तयार झाला होता. पण पावसामुळे कच्या विटांचेही मोठय़ाप्रमाणात नुकसान होऊन त्याचा फटका व्यावसायिकांना बसला.

ऊस तोड खोळंबली

या भागात बऱयाच ठिकाणी ऊस तोड सुरू आहे. पण अचानक पडलेल्या पावसामुळे वाहने मळ्य़ापर्यंत पोहोचत नसल्याने ऊस तोडही खोळंबली आहे. गेल्या दहा दिवसापूर्वीही अचानक मुसळधार पाऊस आला होता. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात थंडीलाही सुरुवात झाली होती. पण अचानक पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांचेच त्रेधा तीरपीट उडाली.

नंदगड, कसबा नंदगड, बेकवाड, झुंजवाड या भागातील विद्युत पुरवठाही काही काळापासून खंडित झाला आहे.