|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवाजीराव कागणीकर यांना देवराज अर्स पुरस्काराने सन्मानित

शिवाजीराव कागणीकर यांना देवराज अर्स पुरस्काराने सन्मानित 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावचे सर्वेदयी नेते शिवाजीराव कागणीकर यांना कर्नाटक सरकारने देवराज अर्स पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पाच लाख रुपये व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे. कागणीकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, रात्र शाळा, भ्रष्टाचार निर्मूलन कार्यक्रम, अंगणवाडी कर्मचाऱयांसाठीचे आंदोलन अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. कट्टणभावी येथील माळरानावर त्यांनी नंदनवन फुलविले आहे. त्याचबरोबरच परिसरात 500 हून गोबरगॅस प्रकल्प उभारणीस त्यांनी मदत केली आहे. त्यांनी 2 लाख 50 हजारांपेक्षा अधिक रोपांची लागवड करून परिसर हिरवागार केला आहे.

साधी रहाणी उच्च विचार सारणी याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांनी बीएससी पर्यंतचे शिक्षण घेऊनही अंगावर खादी शर्ट, हाफ पॅन्ट व डोक्मयावर गांधी टोपी असा त्यांचा पेहराव असतो. याच त्यांच्या साधेपणामुळे ते जास्त चर्चेत असतात. कोणताही गाजावाजा न करता आपले काम प्रामाणिक पद्धतीने करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. वाहनाचा वापर न करता सायकलवरून ते दुसऱया गावांना फिरत असतात.

यापूर्वीही त्यांना अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले आहे. गोर गरिबांना न्याय मिळावा यासाठी आजही ते रस्त्यावर उतरतात. देशातील भ्रष्टाचार पूर्णपणे बंद करावा यासाठी ते आंदोलनांमध्ये देखील सहभागी होत असतात. सेंद्रीय शेती, जैविक शेती, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम ते करत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बेंगळूर येथे विधानसौध परिसरात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.