|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अधिवेशन खर्च कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न

अधिवेशन खर्च कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न 

प्रतिनिधी/ बेळगाव

अधिवेशनाचा खर्च कसा कमी होईल याकडे यावषी जातीने लक्ष देण्यात आले आहे. याचबरोबर या अधिवेशन काळात सर्वसामान्य जनतेला रहदारीचा त्रास होवू नये यासाठीही मुख्यमंत्र्यांनी शुन्य रहदारी बाबत गांभीर्य घेतले असल्याचे विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मागीलवेळी जेवणामुळे आरोग्य मंत्र्यांचीच तबेत बिघडली होती. याचबरोबर इतर अधिकारी व मंत्र्यांचीही तबेत खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे यावषी जेवण उत्तम प्रकारे मिळावे यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महत्वाचे म्हणजे 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात होणाऱया अधिवेशनावेळी बेळगाव शहरातच सर्व मंत्री व आमदार राहणार आहेत. ते ये-जा करत असताना इतर वाहन चालकांना व रहदारीला त्रास होवू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आमच्यापासून जनतेला त्रास होवू नये यासाठी अधिक लक्ष द्या, अशी सूचना केली आहे, असे बसवराज होरट्टी यांनी सांगितले.

अधिवेशनामध्ये प्रदीर्घ चर्चा व्हावी व समस्या सुटाव्यात यासाठी अधिक भर दिला जाणार आहे. बेंगळूर येथून येणाऱया सर्व अधिकारी व कर्मचाऱयांची सोय उत्तम प्रकारे केली जाणार आहे. जेवण, राहण्याची सोय, विद्युत पुरवठा, वाहनांची व्यवस्था, शौचालय व महत्वाचे म्हणजे आरोग्याची सुविधा उपलब्ध करण्याकडे भर देण्यात आला आहे. या काळात पोलीस बंदोबस्तासाठी परजिह्यातूनही पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. त्यांचीही सोय उत्तम प्रकारे व्हावी यासाठी दखल घतेली गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या अधिवेशनासाठी 249 आमदार, 1350 अधिकारी, 450 वाहन चालक यांचा फौजफाटा बेळगावात दाखल होणार आहे. यासाठी ही सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे अधिवेशन काळात बेळगाव परिसरात मंत्र्यांना व आमदारांना शुभेच्छा देणारे फलक उभे करण्यात येत असतात. त्यावरही निर्बंध घालण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मागीलवेळी ज्या समस्या उद्भवल्या त्या समस्या दूर करण्यासाठी अधिक लक्ष देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विधीमंडळमधील कामकाजाबद्दल बोलताना, संपूर्ण कर्नाटकातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदारांनी उपस्थित रहावे, यासाठी त्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. आता आमदारांनी उपस्थित राहून आपल्या भागातील समस्यांबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. अधिवेशन म्हणजे केवळ एक सहलीचा भाग होवू नये यासाठी आम्ही जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर, अधिवेशनानिमित्त नियुक्त करण्यात आलेले विशेष अधिकारी उज्वलकुमार घोष, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी,  पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर., पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.