|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » ‘एनएफएआय’ला मिळाला माहितीटांचा खजिना अनेक दुर्मीळ फिल्म्स् प्राप्त

‘एनएफएआय’ला मिळाला माहितीटांचा खजिना अनेक दुर्मीळ फिल्म्स् प्राप्त 

पुणे / प्रतिनिधी :

एकाच वेळी 2200 लघुपटांचा आणि माहितीपटांचा प्रचंड मोठा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. एकाच वेळी इतक्मया मोठय़ा संख्येने रिळांमधील चित्रपट मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.

इतिहास, संगीत, विज्ञान, शिक्षण अशा विविध विषयांना वाहिलेल्या अशा अनेक लघुपट आणि माहितीपटांचा यामध्ये समावेश आहे. राज्य शासनाच्या पुणे येथील दृक-श्राव्य शैक्षणिक संस्थेकडून प्राप्त झालेल्या या खजिन्यात 16 एमएमच्या सुमारे 2200 फिल्म्स्चा समावेश आहे.

या दुर्मीळ फिल्म्समध्ये पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राजा केळकर संग्रहालयावर 1950 च्या सुमारास तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचा समावेश आहे. त्याचबरोबर लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही उर्फ दादासाहेब मावळंकर, तत्कालीन केंद्रीय मंत्री न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ, पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त स. गो. बर्वे आदी मान्यवरांनी राजा केळकर संग्रहालयाला केळकर कुटुंबासमवेत दिलेल्या भेटींना या माहितीपटात उजाळा देण्यात आला आहे.

दुसऱया एका दुर्मीळ फिल्ममध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील महान गायिका हिराबाई बडोदेकर तसेच त्यांच्या भगिनी सरस्वती राणे यांच्या आवाजातील साऊंड ट्रक ऐकायला मिळतो. सुप्रसिद्ध पखवाजवादक पं. गोविंदबुवा बुऱहाणपूरकर यांनी वाजवलेला सोलो पखवाजही यावेळी ऐकायला मिळतो. 1947 मध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ललत’ या संगीतावर आधरित नाविन्यपूर्ण चित्रपटासाठी या स्नाऊंड ट्रकचा खास वापर करण्यात आला होता. कवींचा कवी ‘केशवसुत’ या लघुपटाचाही या दुर्मिळ फिल्म्स्मध्ये समावेश आहे. योगी अरविंद यांच्या जीवनावर आधरित दोन लघुपटाचाही या दुर्मिळ फिल्म्समध्ये समावेश आहे. प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची निर्मिती असलेल्या अन्य एका दुर्मिळ माहितीपटात महाराष्ट्रातील पारंपरिक गाणी आणि नृत्ये याची दृश्ये पाहायला मिळतात.

‘आजचे पुणे, सोलापूर, अहमदनगर’ आणि ‘आजचे सातारा, सांगली कोल्हापूर’ या दोन माहितीपटात पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळात त्या त्या जिह्यात झालेल्या विकासाचा सखोल माहितीपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. ‘तंजावर’ या सांस्कृतिक राजधनीची ओळख करून देणाऱया चित्रपटाचाही यामध्ये समावेश आहे. ‘रायटर्स’ आणि ‘पोएट्स इन गुजरात’ या दोन भागातील माहितीपटात गुजरातमधील प्रसिद्ध लेखक उमाकांत जोशी, पन्नालाल पटेल, बालमुकंद दवे, यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

याशिवाय, जपान, रशिया, नॉर्वे, वेस्ट इंडिज, ब्रिटन आदी देशातील लोकजीवन, विविध परंपरा आणि संस्कृतीच्या माहितींवर आधरित काही लघुपट या संग्रहात आहेत. विशेष म्हणजे नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडाने तयार केलेल्या एका खास चित्रपटात ‘फिल्म स्ट्रिप्स’ च्या माध्यमातून मुले कसे शिक्षण घेतात याचीही माहिती देण्यात आली आहे.

जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वीच्या आणि वेगवेगळय़ा विषयांवरील या दुर्मीळ फिल्मस म्हणजे भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनमोल ठेवा आहे त्यामुळे त्यांचे फारच मोठे महत्त्व आहे. शिवाय एकाचवेळी एवढय़ा प्रचंड मोठय़ा संख्येने सेल्युलॉईड (रीळ) अशा फिल्म्स राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात समाविष्ट झाल्याबद्दल होणारा आनंद अवर्णनीय आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी त्याचे स्वागत केले.