|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सैनिक हुतात्मा

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सैनिक हुतात्मा 

श्रीनगर :

काश्मीर खोऱयात सलग दुसऱया दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने गुरुवारी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्हय़ातील सैन्याच्या चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैनिक हुतात्मा झाला आहे. शस्त्रसंधी उल्लंघनानंतर नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागांमध्ये सैन्याने गुरुवारी संध्याकाळी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानने गुरुवारी संध्याकाळी माछिल सेक्टरमध्ये गोळीबार केला असून याच  सेक्टरमधून दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. या गोळीबारच्या आडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची शक्यता पाहता सैन्याने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात आले.

बुधवारी रात्री उशिरा देखील पाकिस्तानने बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानच्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला होता. जखमी सैनिकाला श्रीनगरच्या 92 बेस रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.