|Sunday, August 18, 2019
You are here: Home » क्रिडा » स्पेनला बरोबरीत रोखत न्यूझीलंडची आगेकूच

स्पेनला बरोबरीत रोखत न्यूझीलंडची आगेकूच 

वृत्तसंस्था / भुवनेश्वर :

न्यूझीलंडने झुंजार खेळ करीत दोन गोलांची पिछाडी भरून काढत येथे झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील साखळी सामन्यात स्पेनला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले. या निकालामुळे न्यूझीलंडने गट अ मधून क्रॉसओव्हर फेरीत स्थान मिळविले आहे. अन्य एका सामन्यात फ्रान्सने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनाला 5-3 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत क्रॉसओव्हर फेरीत स्थान मिळविले.

फ्रान्सने 4 गुणांसह सरस गोलसरासरीच्या आधारे दुसरे तर 4 गुण मिळविणाऱया न्यूझीलंडने तिसरे स्थान मिळविले आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱया स्पेनने पहिल्या दोन सत्रात दोन गोल नोंदवत विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती. अल्बर्ट बेल्ट्रानने नवव्या व अल्वारो इग्लेसिअसने 27 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले. मात्र उत्तरार्धातील शेवटच्या दहा मिनिटांत न्यूझीलंडने जोरदार मुसंडी मारत बरोबरी साधून पराभव टाळण्यात यश मिळविले आणि क्रॉसओव्हर फेरीतही स्थान मिळविले. 50 व्या मिनिटाला हेडन फिलिप्सने तर 56 व्या मिनिटाला केन रसेलने हे गोल नोंदवले. अ गटात अर्जेन्टिनाने दोन सामन्यांतून 6 गुण घेत अग्रस्थान घेतले आहे तर न्यूझीलंडने 4 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. स्पेनचे 2 गुण झाले आहेत. या गटातील अर्जेन्टिना-फ्रान्स या शेवटच्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी अर्जेन्टिना पहिल्या स्थानावर राहणार आहे. शुक्रवारी ऑस्टेलिया व चीन आणि आयर्लंड व इंग्लंड या ब गटातील संघांचे सामने होणार आहेत.

स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार चारही गटात अव्वल स्थान मिळविणारे संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी थेट पात्र ठरणार आहेत तर दुसरा व तिसऱया क्रमांकावरील संघ इतर गटातील दुसऱया व तिसऱया क्रमांकावरील संघांशी क्रॉसओव्हर सामने खेळणार आहेत. यातून उपांत्यपूर्व फेरीसाठी उर्वरित चार संघ निश्चित केले जातील.