|Sunday, August 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पुजारा लढला, बाकी सारे ढेपाळले!

पुजारा लढला, बाकी सारे ढेपाळले! 

वृत्तसंस्था /ऍडलेड :

मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने लढवय्या, झुंजार शतक झळकावल्याने भारताला अन्य फलंदाजांच्या अपयशानंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. मधल्या फळीत तळ ठोकून उभे राहण्यासाठी विशेष ओळखल्या जाणाऱया पुजाराने 246 चेंडूत 123 धावांचे योगदान देत फलंदाजीतील गतवैभवाच्या पाऊलखुणांना चांगलाच उजाळा दिला. भारतीय संघ येथे 50 षटकात एकवेळ 6 बाद 127 अशा अतिशय अडचणीच्या स्थितीत होता. पण, पुजारा व अश्विन यांनी सातव्या गडय़ासाठी 62 धावा जोडत भारताला सुस्थिती प्राप्त करुन दिली.

पुजाराने आक्रमक शैलीला बरीचशी मुरड घालत संयमी पवित्र्यावर भर दिला आणि याचमुळे भारतीय संघातर्फे तोच सर्वाधिक यशस्वी फलंदाज देखील ठरला. अखेर पॅट कमिन्सने एका थेट थ्रोवर धावचीत करत पुजाराची ही संयमी, शतकी खेळी संपुष्टात आणली. पुजारा बाद झाल्यानंतर त्याचवेळी दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण, मिशेल स्टार्क, जोश हॅझलवूड व पॅट कमिन्स यांच्या तिखट माऱयासमोर आघाडी फलंदाजी सातत्याने कोसळत राहिली आणि दस्तुरखुद्द विराट कोहली देखील इथे या पडझडीचाच एक भाग बनून राहिला. त्याला स्वतःलाही स्वस्तातच गारद व्हावे लागले.

पुजाराच सर्वात यशस्वी फलंदाज

उपाहाराअखेर 4 बाद 56 अशी कमालीची दैना उडालेली असताना अडीचशे धावांचा टप्पा सर करणे जणू डोंगर सर करण्यासारखे होते. पण, पुजारा ठामपणे तळ ठोकून उभा राहिला आणि त्याच्या कारकिर्दीतील 16 व्या शतकाने संघाला सुस्थितीत नेले. त्याच्या या जिद्दी खेळीत 7 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. 30 वर्षांच्या पुजाराने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत काही महत्त्वपूर्ण भागीदारी साकारल्या. त्याने चहापानानंतर रविचंद्रन अश्विनसमवेत सातव्या गडय़ासाठी 62 धावांची धीरोदात्त भागीदारी साकारली. एकीकडे, आघाडी फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली असता त्याने अश्विनसमवेत साकारलेली ही भागीदारी विशेष लक्षवेधी ठरली.

भागीदारीला कमिन्सचा सुरुंग

कमिन्सने डावातील 74 व्या षटकात अश्विनला दुसऱया स्लीपकडे झेल देणे भाग पाडत या जोडीला पहिले खिंडार पाडले. पुढे इशांत शर्मासह (4) पुजाराने आणखी 21 धावा जोडल्या. या भागीदारीमुळे भारताला 79 व्या षटकात 200 धावांचा टप्पा सर करता आला. यादरम्यान, योग्य डीआरएस घेतल्याने इशांत पायचीत दिले गेल्यापासून बचावला. मात्र, या संधीचा त्याला फारसा लाभ घेता आला नाही. स्टार्कने एका अप्रतिम चेंडूवर इशांतचा त्रिफळा उडवला. तळाचे फलंदाज असे घाईगडबडीने बाद होत असल्याचे दिसून आल्यानंतर पुजाराने फटकेबाजीवर भर दिला.

अर्थात, त्यापूर्वी पुजाराची संयमी फलंदाजी व ठाण मांडून राहण्याची प्रवृत्तीच भारतीय डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरली. चहापानाअखेर 6 बाद 143 अशी पडझड झालेली असताना केवळ पुजाराच्या संयमी खेळीमुळेच भारताला यातून सावरता आले. रोहित शर्माकडून चुकीच्या फटक्याची निवड आश्चर्याची ठरली. तो बाद झाला, त्यावेळी भारताची 38 षटकात 5 बाद 86 अशी दैना उडाली होती.

रोहितची फटकेबाजी, मात्र…

उपाहारानंतर रोहित व पुजारा यांनी पाचव्या गडय़ासाठी 45 धावांची भागीदारी साकारली. पुजाराने कमिन्सला लगावलेले दोन उत्तूंग षटकार तितकेच खणखणीत ठरले. रोहितने नॅथन लियॉनला (2-83) षटकार खेचत आक्रमक फलंदाजीचे इरादे स्पष्ट केले. पण, दुर्दैवाने त्यापुढील चेंडूवरच तो बाद झाला. रोहितप्रमाणेच ऋषभ पंतही आक्रमक इराद्यात होता. त्याने 2 चौकार व एक षटकार खेचत त्याची चुणूक दाखवली. पुजाराने त्याला संयमावर भर देण्याचा सल्ला जरुर दिला. पण, तो पंतच्या खेळीला मानवला नसल्याचे झटकन दिसून आले. आपल्या नैसर्गिक शैलीच्या विरोधात जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात पंत फिरकीपटू लियॉनच्या गोलंदाजीवर बाद झाला.