|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » क्रिडा » शेवटची कसोटी रंगतदार स्थितीत

शेवटची कसोटी रंगतदार स्थितीत 

वृत्तसंस्था /अबु धाबी :

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची कसोटी गुरूवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. कर्णधार विलीयमसनचे नाबाद शतक व निकोल्सचे नाबाद अर्धशतक आणि या दोघांच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडने दुसऱया डावात 4 बाद 272 धावा जमवित पाकवर 198 धावांची आघाडी मिळविली आहे. चौथ्या दिवशी पाकच्या यासिर शाहने बळींचे द्विशतक सर्वात कमी कसोटीत साजरे करीत नवा विक्रम नोंदवला आहे.

उभय संघांतील तीन सामन्यांची ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरी असून या शेवटच्या आणि निर्णायक कसोटीत अनपेक्षित निकाल लागण्याची आशा वाटते. तिसऱया कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 274 धावा जमविल्यानंतर पाकचा पहिला डाव 348 धावांत आटोपला. पाक संघातील अझहर अली आणि आसद शफीक यांनी शानदार शतके झळकविली. पाकने पहिल्या डावात 74 धावांची आघाडी मिळविली. दरम्यान न्यूझीलंडने 2 बाद 26 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. दिवसअखेर त्यांनी 104 षटकांत 4 बाद 272 धावा जमविल्या. कर्णधार विलीयमसन आणि निकोल्स या जोडीने पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 212 धावांची भागिदारी केली. विलीयमसन 13 चौकारांसह 139 तर निकोल्स 8 चौकारांसह 90 धावांवर खेळत आहेत. चौथ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर नाईटवॉचमन सॉमरव्हिले हा न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज यासीर शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याच्यानंतर शाहीन आफ्रिदीने रॉस टेलरला आसिफकरवी झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 4 बाद 60 अशी केविलवाणी होती पण त्यानंतर  विलीयमसन आणि निकोल्स या जोडीने अभेद्य द्विशतकी भागिदारी करून संघाचा डाव सावरत मोठी आघाडीही मिळविली. पाकतर्फे यासीर शाहने 107 धावांत 2 तर शाहीन आफ्रिदीने 55 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यातील खेळाचा शेवटचा दिवस बाकी आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड प. डाव- सर्वबाद 274, पाक प. डाव- 135 षटकांत सर्वबाद 348, न्यूझीलंड दु. डाव- 104 षटकात 4 बाद 272 (विलीयमसन खेळत आहे 139, निकोल्स खेळत आहे 90, टेलर 22, रॅव्हेल 9, लेथम 10, सॉमरव्हिले 4, यासीर शहा 2/107, शाहीन आफ्रिदी 2/55).