|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासळी आयातीबाबत एफडीए अधिक सक्त

मासळी आयातीबाबत एफडीए अधिक सक्त 

प्रतिनिधी /पणजी :

अन्न आणि औषध संचालनालयाला चुना लावून इन्सुलेटेड वाहनातून मासळी आयात करणाऱयांवरही आता संचालनालयाने कारवाईची तयारी केली आहे. मासळी कुठून आणि कोणत्या व्यवसायिकासाठी आणली याबाबतचे चलान उपलब्ध केल्याशिवाय मासळीचे ट्रक गोव्यात येऊ नये, यासाठी पेडणे आणि काणकोण पोलिसाना एफडीएने लेखी आदेश दिला आहे.

काही व्यवसायिक गोव्यात इन्सुलेटेड वाहनातून मासळीची आयात करतात. वाहतूक परवाना घेऊन ही वाहतूक केली जाते, मात्र मासळी कुणाकडून आणली किंवा कुणासाठी आणली याबाबतचे चलन उपलब्ध केले जात नाही. ती कोणत्या तारखेला किती वाजता ती गाडी कुठून सुटली, तिने किती तास प्रवास केला याबाबतची माहिती उपलब्ध केली जात नाही.

एकाही व्यवसायिकाकडे नाही एफडीए परवाना

आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत घाऊक मासळी विक्रीसाठी अन्न आणि औषध संचालनालयाकडून एकाही व्यापाऱयाने परवाना घेतलेला नाही. त्यामुळे आता अशा व्यवसायाविरोधातही संचालनालयाने कारवाईचा निर्णय घेतला आहे.

कागदपत्रे तपासण्याची पोलिसांना सूचना

अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी पेडणे आणि कोणकोण पोलिसस्थानकाच्या निरीक्षकांना पत्रे पाठविली आहेत. मासळी आयात करणाऱया वाहनांचे चलान तपासण्याची सूचना या पत्रातून केली आहे. इन्सुलेटेड वाहनातून आणली जाणारी मासळी कोणत्या व्यवसायिकाकडून आणली व गोव्यातील कोणत्या व्यवसायिकाला या मासळीचा पुरवठा केला जातो याचीही तपासणी करण्याची सूचना पोलिसाना केली आहे.

Related posts: