|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाच अट्टल दरोडेखोरांना अटक

पाच अट्टल दरोडेखोरांना अटक 

प्रतिनिधी /बेळगाव :

दरोडय़ाच्या तयारीत असताना शहापूर पोलिसांनी बुधवार दि. 5 डिसेंबर रोजी पाचजणांना अटक केले होते. या कारवाई पाठोपाठ बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी पाच अट्टल दरोडेखोरांना अटक केले असून त्यांच्याजवळून दोन मोटारसायकली, दोन चाकू, दोन मनगटी घडय़ाळे, एटीएम कार्ड, 1500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे.

रामेश्वरनगर हुंचेनहट्टी येथे 28 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास एका घरावर दरोडा टाकण्यात आला होता. चार्ली पाटील यांच्या घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी घरातील मंडळींना एका खोलीत कोंडून चाकूचा धाक दाखवून ट्रंकमधील मनगटी घडय़ाळ, रोख रक्कम, एटीएम कार्ड पळविण्यात आले होते. याप्रकरणी मंगळवार दि. 4 डिसेंबर रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक कृष्णवेणी, बी. ए. चौगला, ए. बी. शेट्टी, एस. आर. शिरसंगीकर, दीपक माळवदे, वाय. वाय. तळेवाड, बी. के. चिगरट्टी, मल्लिकार्जुन गाडवी, बी. सी. जंतीकट्टी, सी. एम. हुनशाळ, एस. एम. लोकूरे, एस. एन. पच्चन्नवर, बी. एस. पडनाड आदींचा समावेश असलेल्या एका पथकाने गुरुवारी मच्छे औद्योगिक वसाहत परिसरात पाच जणांना अटक केले.

शिवानंद अशोक करनाईक (वय 33), बाळाप्पा लक्ष्मण नाईक (वय 22 दोघेही रा. हावळनगर मच्छे), अनिल रूद्राप्पा माटोळी (वय 19), शिवनगौडा रुद्राप्पा गौडर (वय 23 दोघेही रा. संभाजीनगर मच्छे), सुनिल भरमाप्पा हुडेद (वय 21 रा. टीपीनगर मच्छे), अशी अटक करण्यात आलेल्या पाचजणांची नावे आहेत. त्यांच्यावर भादवी 395 कलमन्वये दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.