|Saturday, February 16, 2019
You are here: Home » Top News » ‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व : सुशीलकुमार शिंदे

‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व : सुशीलकुमार शिंदे 

ऑनलाईन टीम / पुणे :

“महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. परंतु प्रत्यक्षात महिलांचे नेतृत्व उभारण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख देण्यासह स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले. महिलांना स्वयंरोजगार कसा द्यावा, याचे उत्तम उदाहरण लिज्जत पापडच्या रूपाने आपल्यासमोर आहे,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या महोत्सवात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते उल्हासदादा पवार, काँग्रेसचे नेते अभय छाजेड, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते राहुल सोलापूरकर, खासदार वंदना चव्हाण, युएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे, सचिन ईटकर, संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर, संचालिका सुमन दरेकर, चेतना नहार, कमल कोळगे, मंदाकिनी डावखे, रत्नमाला जाधव, विमल कांबळे उपस्थित होते. यावेळी राहूल सोलापूरकर यांच्या ‘प्रभात ते सैराट’ या मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रवासावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘घरात असणाऱया महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे काम लिज्जत पापडने केले आहे. आज लिज्जत पापडच्या कुटुंबात 50 हजार पेक्षा जास्त महिला काम करत आहेत. या उद्योग समूहाचे नेतृत्व महिलांच्या हाती असल्याने त्याचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने होते आहे. शिवाय, महिलांमधील नेतृत्वगुण विकसित होत आहेत. आगामी काळातही हे काम असेच सुरु राहावे.’

सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, ‘महिलांना सन्मान आणि आत्मविश्वास देण्याचे काम ‘लिज्जत’ने केले आहे. दिवसभर कष्ट करून आपल्या संसाराला हातभार लावणाऱया बायकोचे कौतुक करण्याची सवय नवऱयाने लावावी. त्यातून नात्यातील गोडवाही वाढेल. आपल्या कुटुंबातील आपण प्रमुख आहोत याच आत्मविश्वासाने आपण आयुष्य जगले पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे आहे.’

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘लिज्जतचा हा पुरस्कार म्हणजे माहेरची साडी मिळाल्याचा आनंद आहे. जगभरात आपल्या उद्योगाची ख्याती पसरविणाऱया ‘लिज्जत’वर चित्रपट बनावा. विविध अनुभवांचा सामना करीत या महिलांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्याप्रमाणेच मुलीला आणि सुनेलाही घडवावे. त्यांची प्रेरणा बनावे.’

अनिता दाते म्हणाल्या, ‘लहानपासून लिज्जत पापडची जाहिरात पाहत आले आहे. ती जाहिरात पाहून पापड खायची नेहमीच इच्छा व्हायची. इतकेच नव्हे, तर ‘राधिका’ साकारतानाही तुमच्या सर्वांकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी काम करते. त्यातूनच ती प्रमुख बनते.’ यावेळी ‘लिज्जत पापड’तर्फे सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन संसथेला तीन लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले. माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. सुरेश कोते यांनी आभार मानले.

Related posts: