|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » चित्रपटांमुळे भारत इस्त्रायल संबंध अधिक दृढ : वॉलमन

चित्रपटांमुळे भारत इस्त्रायल संबंध अधिक दृढ : वॉलमन 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘चित्रपट माध्यमातून भारत आणि इस्रायल मधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले असल्याचे मत इस्रायलचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथाकार डॅन वॉलमन यांनी व्यक्त केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इस्रायली चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॅन वॉलमन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. इस्रायली दूतवासातील डेप्युटी काऊन्सल जनरल निमरोद काल्मार, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘पीआयसी’च्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, समन्वयक लतिका पाडगांवकर यावेळी उपस्थित होते.

डॅन वॉलमन म्हणाले, ‘मी अनेक वर्षे भारतामध्ये येत असून इथे एक छोटा चित्रपट ही तयार केला आहे. भारत आणि इस्रायलमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान सुरुच आहे. चित्रपट हे एक असे मध्यम आहे, की ज्यामुळे हे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील.’

निमरोद काल्मार म्हणाले, इस्रायली समाजातील अडचणी मांडण्याचे, सिनेमा हे एक शांततामय माध्यम आहे. भारतीय आणि इस्रायली सिनेमाने एकत्र काम करावे.

प्रकाश मगदूम म्हणाले, सिनेमा ही चित्रभाषा असून, त्याला कोणत्याही भाषेचे बंधन नसते, त्यामुळेच जग जवळ येते. अनेक इस्रायली चित्रपटांवर हिंदी सिनेमाचा प्रभाव आहे.

प्रा. अमिताव मलिक म्हणाले, शेजारील देशांतील चित्रपट आपल्या देशात दाखविले जावेत, त्यांची संस्कृती आपल्याला कळावी, त्याचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने ‘पीआयसी’ गेल्या काही वर्षांपासून चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे.’

लतिका पाडगांवकर म्हणाल्या, ‘परंपरा, समाज, धर्म, राजकारण आणि व्यक्तींविषयी बोलणारे हे चित्रपट भारतासाठी इस्रायलचे दरवाजे उघडतात.’ उद्घाटनानंतर डॅन यांचा ‘ऍन इस्रायली लव्ह स्टोरी’, हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिसा पिंगळे यांनी केले.

‘पीआयसी’च्या वतीने आयोजित होत असलेला हा सलग बारावा चित्रपट महोत्सव आहे. यापूर्वी ‘पीआयसी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवामध्ये बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, इराण, नेपाळ, श्रीलंका आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते. या महोत्सवाचे शुक्रवार 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेपर्यंत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये ‘यानाज् प्रेंडस’, ‘स्ट्रेंजर्स’, ‘दि बॅण्डस व्हिजीट’, ‘दि सिरीयन ब्राईड’, ‘लेमन ट्री’, ‘ऍन इस्रायली लव्ह स्टोरी’, ‘पासओव्हर फिव्हर’, ‘माय मायकल’ ‘फूटनोट’, ‘माय फादर, माय लॉर्ड’, ‘थर्स्ट’ या चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवादरम्यान दाखविण्यात येणाऱया चित्रपटांना महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकने आणि पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय महोत्सवातील काही चित्रपट हे इस्रायलच्या वतीने ऑस्करमधील ‘बेस्ट फॉरेन लॅऩग्वेज फिल्म’ स्पर्धा विभागात अधिकृतपणे पाठविण्यात आले होते. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.