|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विकासाचे वणवे

विकासाचे वणवे 

लोकसंख्या वाढीमुळे औद्योगिक आणि बांधकाम विकासाला वेग आला आहे. यामध्ये जमिनीची गरज भासल्याने वन क्षेत्रालाच लक्ष्य केल्याचे दिसते. त्यासाठी निबीड अरण्ये आणि पशू-पक्षी नष्ट झाले. मुंबईदेखील याला अपवाद नाही. एकेकाळी सात बेटांची मुंबई आता एकजीव झाली आहे. यामध्ये मानवी वस्तीमध्ये झालेली वाढ, वाहतूक, औद्योगिकीकरण, बांधकाम, मनोरंजन साधने यामुळे येथील जंगले नष्ट केली गेली. मुंबईला ऑक्सिजन पुरवठा करणाऱया संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील खारफुटीची जंगले जाळून, वणवे लावून नष्ट केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय उद्यानालगत लागलेली आग विझवली असली तरी सदर आग कोणीतरी मुद्दाम लावल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे असे वणवे लावून शाश्वत विकास शक्य आहे का, असा सवाल निर्माण होतो.

 

18 व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. त्याचे वारे मुंबईतही वाहू लागले. साहजिकच त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मुंबईकडे वळले. मात्र, जसजसे उद्योगाचे क्षेत्र वाढत गेले तसतसे लोंढे वाढू लागले. त्यामुळे कामगारांच्या रहिवासाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, त्यांना चांगली राहण्याची व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, यासह इतरही गरजा भासू लागल्या. त्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी मदत आणि सहकार्य केले. मात्र, आता परराज्यातून आलेले लोंढे जागा मिळेल तेथे पथारी मांडू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाला कारभार चालविणे जिकरीचे झाले आहे. मागील काही वर्षात मानवीवस्तीचे क्षेत्रही विस्तारत गेल्यामुळे परिणामी आजूबाजूच्या वन्यसृष्टीवर कुऱहाड चालवली जावू लागली. मात्र, आता बांधकामांना वेग आल्याने चक्क बिल्डर लॉबी प्रशासकीय अधिकाऱयांना हाताशी धरून वणवे लावत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई महापालिकेसह बहुतांशी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टय़ांना आगी लावल्या जातात. कालांतराने लोकप्रतिनिधींना हाताशी धरून आणि व्होट बँका पाहून सदर झोपडय़ा अधिकृत केल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही.

एकेकाळी देशात मुबलक पाणी आणि वनसंपदा होती. मात्र, मानवी जीवनाला घातक ठरत असल्याने तत्कालीन परिस्थितीत श्वापदांचा होणारा त्रास रोखण्यासाठी काही प्रमाणात जंगल तोड होऊ लागली. यामुळे त्रास कमी झाला असला तरी आता जंगलतोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. मुंबई आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक आणि खारफुटीची जंगले आहेत. मुंबईत मोठय़ा प्रमाणात होणाऱया प्रदूषणावर ही जंगले प्राणवायूचा पुरवठा करून मुंबईकरांसाठी फुफ्फुसाचे काम करतात. मात्र, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील खारफुटीच्या जंगलांसह राष्ट्रीय उद्यानाचा परिसर आगी, वणवे लावून नष्ट केला जात आहेच. त्याचप्रमाणे डेब्रिज आणि कचरा टाकून सपाटीकरण केले जात आहे.

मुंबईला लागून असलेल्या पालघर, ठाणे, रायगड या जिह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात राखीव वने आहेत. मात्र, बिल्डर्स आणि धनदांडग्यांकडून बंगले, फार्म हाऊस, विकेंड होम, गुंतवणुकीच्या नावाखाली हा जमीनही गिळंकृत करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. तसेच महामार्ग, रेल्वे, मेट्रो, गृहप्रकल्प, औद्योगिकीकरणाच्या नावाखाली झाडांची अक्षरश: कत्तलच केली जात आहे. यात कंत्राटदार, प्रशासनाची मिलीभगत असल्याचे दिसते. तर, वनखातेही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग या रस्त्यांच्या कामांसाठी मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. त्यावेळी, तोडण्यात आलेल्या झाडांएवढीच झाडे पुन्हा लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यातील किती झाडे लावली आणि त्यातही किती जगली, हा वादाचा विषय आहे.

विद्यमान सरकारनेही जवळपास 50 कोटी झाडे लावण्याचे कार्य हाती घेतले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला असे वृक्षारोपणाचे मोठे इव्हेंट होतात. सरकारचे हे कार्य स्तुत्य असले तरी यातील किती झाडे जगली, हा देखील प्रश्न आहे. राज्यात अनेकांकडूनही वृक्षारोपण केले जाते. याला यश आले असले तरी काही समाजकंटक ती जाळून अथवा उपटून टाकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

सध्या मुंबई आणि परिसराला देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी महामार्गसारखे प्रकल्प वेगाने सुरू आहेत. यामध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे तोडली जात असून मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड तर ऐन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच बांधण्याचा घाट घातला आहे. याला स्थानिक आणि पर्यावरणवादी संघटनांचा पाठिंबा असला तरी सरकार निर्णय घेईल तीच पूर्व दिशा असेल, हे नक्की. त्यातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय उद्यानालगत खाजगी जागेत मोठा वणवा लागला. याबाबत, वन खात्याने हात वर केले असले तरी या आगी लावण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याचे स्थानिक सांगतात. सदर जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने या आगी लावल्या जात असून वनसंपत्ती नष्ट झाल्यावर सदर नापिक जमीन म्हणून घशात घालण्याचा मोठा डाव असल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले. या वणव्यात वनखात्याने पशू-पक्ष्यांची जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले असले तरी रात्रभर वन्यप्राण्यांचे आवाज येत असल्याचे स्थानिक सांगतात. यामागे बिल्डर लॉबीच असल्याचे स्थानिक आणि पर्यावरणवादी सांगतात. त्यामुळे वणवा विझवण्यात यश आले असले तरी त्याला संशयाचा वास येऊ लागला आहे. मात्र, त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. आग, वीज आणि पाणी हे जसे माणसाचे मित्र आहेत तसेच शत्रूही आहेत.

या आगी किंवा वणव्यांमुळे औषधी वनस्पती, कीटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे या वन्यजीवांचे प्राण जातात याची कल्पना सहज लक्षात येत नाही. पाळीव जनावरांना एकेकाळी जंगलात सहज उपलब्ध होणारा भरपूर चारा आता मिळेनासा झाला आहे. सरपटणारे प्राणीही नष्ट होत चालले आहेत. पक्ष्यांना गवतावरील किडे, बीज खाण्यास मिळत नसल्यामुळे ते स्थलांतरित किंवा मफत्युमुखी पडत आहेत. विविध पक्ष्यांचा हिवाळ्यात प्रजनन काळ असतो. नेमके याच दिवसात वणवे पेटल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्ले जळून जातात. सहज पेटवलेल्या शेकोटीचेही आग आणि वणव्यात रुपांतर होऊन मोठी हानी होत असते. यासाठी वन विभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. मात्र, त्या तोकडय़ा किंवा कायमस्वरुपी नसल्याचे दिसते. यासाठी जनजागृती करणे आवश्यक असून वन विभाग आणि पर्यावरणवादी यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

-गणेश मते