|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपाक्षेत्रातील 2200 मालमत्ता घरपट्टीविना!

मनपाक्षेत्रातील 2200 मालमत्ता घरपट्टीविना! 

प्रतिनिधी/ सांगली

मनपाक्षेत्रातील मालमत्ता सर्व्हेक्षणामध्ये सुमारे 2200 मालमत्तांची घरपट्टीला नोंद नसल्याचे उघडकीस आले असून संबधितांच्या नोंदी घेऊन घरपट्टी वसूल करण्याचे आदेश शुक्रवारी बैठकीत देण्यात आले. दरम्यान, आणखी पन्नास टक्के सर्व्हेक्षण बाकी असून यामध्येही मोठय़ा प्रमाणात मालमत्ता घरपट्टीविना सापडण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेत शुक्रवारी महापौर सौ. संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी घरपट्टी विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीला कर संकलन अधिकारी नितीन †िशंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. थकबाकी, नवीन मिळकती बाबतची आकारणी, तसेच सर्व्हेक्षण याबाबतचा आढावा घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यापासून मनपाक्षेत्रात मनपाच्या वतीने मालमत्ता धारकांचे सर्व्हेक्षण सुरु केले असून आतापर्यंत 56496 मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या सर्व्हेत 2196 मालमत्तांना घरपट्टी नोंद केली नसल्याचे उघडकीस आले आहे.

या मालमत्तांची तातडीने नोंदी घेऊन घरपट्टी वसूल करण्याच्या सूचना बैठकीत महापौर व आयुक्तांनी दिल्या. मनपाक्षेत्रात एकूण 1 लाख 26 मालमत्ता असून आतापर्यंत 50 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित 50 टक्क्यामध्ये विनाघरपट्टीच्या मालमत्ता सापडण्याच्या शक्यता यावेळी अधिकारी शिंदे यांनी व्यक्त केली. राहिलेले सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करण्याबाबतही सूचना यावेळी देण्यात आल्या. नवीन 1600 मालमत्तांना घरपट्टी आकारणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उत्पन्न वाढीसाठी अधिकाऱयांनी जादा बांधकाम, नवीन मिळकती, गळती याबाबतचा सर्व्हेक्षण करुन मालमत्तांना घरपट्टी आकारणी करावी. या कामात हयगय केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. नगररचना विभागाने घरपट्टी विभागाशी समन्वय साधून बांधकाम परवाने देताना घरपट्टी विभागाची एनओसी घ्यावी असे आदेश देण्यात आला.

बैठकीमध्ये थकबाकी वसूलीसाठी स्वतंत्र पथक नेमून नियोजन पूर्वक वसूली करावी, प्रसंगी जप्ती सारखी कडक कारवाई करण्याबाबतच्या सूचनाही महापौर व आयुक्तांनी दिल्या.

दोन मालमत्ता सील

घरपट्टी विभागाने विश्रामबाग येथील राहुल टॉवर्समधील पारिस इंटरप्रायजेस लि., कंपनीचा फ्लॉट एक लाख रूपये घरपट्टीच्या वसुलीसाठी सील केला आहे. तर रेव्हन्यू कॉलनीतील अग्निशमन कार्यालयासमोरील मंगल चौगुले यांचा दुकान गाळा 1 लाख 37 हजारांच्या वसुलीसाठी सील केला आहे. वॉरंट ऑफीसर शिवाजी शिंदे, प्रमोद कांबळे, सुनील पाटील, दिलीप कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सातहजार घरांमध्ये नळ नाही

महापालिकेने घरपट्टी बरोबरच नळकनेक्शनचे सर्व्हेक्षण सुरू केलेले आहे. आतापर्यंत 57 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये तब्बल 7102 घरांना नळकनेक्शन नसल्याचे उघडकीस आले आहे. या घरातील नागरिक पाणी कोठून पितात? असा सवाल करण्यात येत असून संबंधितांना नळकनेक्शनच्या सक्तीचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.