|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ग्रामीण भागातील लालपरीचा झालाय खुळखुळा

ग्रामीण भागातील लालपरीचा झालाय खुळखुळा 

वार्ताहर/ परळी

परळीसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील प्रवाशांना, तसेच बाहेरून येणाऱया पर्यटकांना रोजच निक्रिय अशी बससेवा असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याला सातारा आगाराच्या अधिकाऱयांकडून पूर्णपणे हरताळ फासला जात आहे. परळी, नित्रळ, केळवली, जांभे, चिखली, चाळकेवाडी, मोरेवाडी, बोरणे या ठिकाणी येणाऱया सर्व बसेस मोडकळीस आलेल्या असतात. त्यामुळे कोणत्या क्षणी एसटी बंद पडेल किंवा एखादा मोठा अपघात होईल, हे सांगता येत नाही. गेल्या 2 महिन्यांपासून एसटी बंद पडण्याच्या प्रमाणात तसेच अपघातात वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

  परळी खोरे हे अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात आहे. परळी हे या भागातील मुख्य ठिकाण असून दळण-वळण, बाजारहाटासाठी, शैक्षणिक तसेच शासकीय कामांसाठी सर्वसामान्य जनतेला परळीत रोज येणे-जाणे असते. ठोसेघर, जांभे, चिखली, कास, नित्रळ, निगुडमाळ, कातवडी, केळवली या ग्रामीण भागातून परळी येथे येणाऱया सर्वसामान्य जनतेला एसटी हेच एकमेव माध्यम आहे. एसटीची फेरी रद्द झाली तर या दुर्गम भागात पर्यायी वाहनदेखील सहज उपलब्ध होत नाही. शिक्षण घेणारे युवक युवती दररोज एसटीने प्रवास करत असतात. परंतु वेळेचे नियोजन नसणे, तसेच गाडय़ांची अवस्था निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी तर चक्क इंजिनावरील पत्रा निघाल्याने चालू गाडीत त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती, परंतु तरीही अशा प्रकारच्या मोडकळीस आलेल्या गाडय़ांचा खुळखुळा संबंधित अधिकाऱयांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात फिरतानाचे चित्र दिसत आहे. सातारा आगाराच्या ग्रामीण लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना घरघर लागली आहे.

   परळी खोऱयात प्रमुख्याने सर्वत्र घाटरस्ते आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांपासून रस्त्याची डागडुजी झालेली नाही. अशातच भरीत भर म्हणून की काय ग्रामीण भागातील एसटी सेवा देखील निकृष्ठ दर्जाची झालेली आहे. तसेच अपघाताची संबंधित विभाग वाट पाहतोय का? असा खोचक प्रश्न देखील येथील नागरिक विचारत आहेत. तरी ग्रामीण भागातील समस्या पाहून सातारा आगाराने चांगल्या दर्जाची तसेच नियोजित वेळेत बस सेवा सुरु करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे…..