|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जननायक जनता पक्षाची घोषणा

जननायक जनता पक्षाची घोषणा 

दुष्यंत चौतालांकडून स्थापना : आयएनएलडीशी मिळताजुळता झेंडा

  वृत्तसंस्था/जींद

इंडियन नॅशनल लोकदलातून (आयएनएलडी) बडतर्फ अजय चौतालांचे दोन्ही पुत्र दुष्यंत आणि दिग्विजय यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. जननायक जनता पक्ष असे याचे नाव असणार असून पक्षाच्या झेंडय़ात 70 टक्के हिरव्या तर 30 टक्के पिवळय़ाचा रंगाचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएलडीचा झेंडा पूर्णपणे हिरव्या रंगाचा आहे. चौधरी देवीलाल यांना जननायक म्हटले जायचे.

जींदच्या पांडू पिडारामध्ये दुष्यंत यांनी रविवारी जाहीर सभा घेतली आहे. 1986 मध्ये देवीलाल यांनी पांडू पिडारा येथूनच न्याययुद्धाची सुरुवात केली होती.

घराण्यातील वाद

चौताला परिवारात 7 ऑक्टोबर रोजीच्या सभेपासून वाद सुरू झाला होता. अभय चौतालांचे भाषण सुरू असताना काही समर्थकांनी ‘दुष्यंत चौताला भावी मुख्यमंत्री होणार’ अशी घोषणाबाजी केली होती. या प्रकारामुळे नाराज ओमप्रकाश चौताला यांनी दुष्यंत यांना फटकारले होते. गोहाना सभेतील वादानंतर दुष्यंत आणि दिग्विजय यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती.

चौताला परिवार

चौताला परिवारात चौधरी देवीलाल यांचे पुत्र ओमप्रकाश यांना दोन मुलगे आहेत. मोठा पुत्र अजय हा शिक्षक भरती घोटाळय़ात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. तर अभय हा सध्या आयएनएलडीचा सर्वेसर्वा आहे. अजयला दोन पुत्र असून मोठा पुत्र दुष्यंत हिसारचा खासदार आहे. तर छोटा पुत्र दिग्विजय हा इंडियन नॅशनल स्टुडंट ऑर्गनायझेनशचा राष्ट्रीय अध्यक्ष होता.