|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » संसदेचे हिंवाळी अधिवेशन आजपासून

संसदेचे हिंवाळी अधिवेशन आजपासून 

विधानसभा निवडणुकांच्या निकालांसह विविध मुद्दे गाजणार : सरकार-विरोधक सज्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

संसदेच्या हिंवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मंगळवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होणार आहेत. या निकालांसह अनेक महत्वाच्या मुद्दे या अधिवेशनात गाजणार आहेत. सरकारी पक्ष आणि विरोधक यांनी एकमेकांना घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. 14 व्या संसदेचे हे अखेरचे पूर्णकाळ अधिवेशन आहे. पुढचे पूर्णकालीन अधिवेशन 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे.

राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागांमध्ये झालेली शेतकऱयांची आंदोलने, काही राज्यांमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती, अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर तापलेले वातावरण, सोनिया  गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित असणाऱया व्यक्तींवर पडलेल्या धाडी, दलितांवरील अत्याचार, राफेल विमान खरेदी, आगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणातील दलाल मिचेल याचे प्रत्यार्पण, सीबीआयमधील अंतर्गत वाद, गोरक्षकांचा प्रश्न, सीमेवरील परिस्थिती अशा अनेक मुद्दय़ांवर एकमेकांना घेरण्याची सर्व तयारी दोन्ही बाजूंनी केली आहे.

निवडणूक निकालांचा परिणाम

अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यांचा सर्वाधिक परिणाम या अधिवेशनावर होणार हे निश्चित आहे. सध्या संसद परिसरात एक्झ्टि पोलच्या सर्वेक्षणांची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीची गणिते प्रकर्षाने मांडली जाणार आहेत.

विरोधी ऐक्यासाठी प्रयत्न

अधिवेशनासाठी सर्व पक्षांचे संसदीय नेते येथे एकत्र जमणार आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या ऐक्याची रूपरेषा ठरविली जाईल, अशी शक्यता आहे. हा मुद्दाही या अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

मोदी विरूद्ध गांधी ?

पुढील लोकसभा निवडणूक नरेंद   मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी होईल काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. या अधिवेशनात त्याची झलक पहावयास मिळेल असे बोलले जात आहे. या दोन नेत्यांमधील या सामन्याचा तोल विधानसभा निवडणूक निकालांवर अवलंबून असेल असे सांगण्यात येत आहे.

बॉक्स

मल्ल्या प्रत्यार्पण निकालाचा परिणाम

भारतीय बँकांना हजारो कोटी रूपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासंबंधी निकाल सोमवारीच ब्रिटनमधील न्यायालयात लागणार आहे. त्यावरही संसदेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. एकंदर, सरकार आणि विरोधी पक्ष स्वतःच्या शस्त्रास्त्रांसह सज्ज असल्याचे पहावयास मिळत आहे.

बॉक्स

लोकसभा निवडणूक वादळाची नांदी

ड हे अधिवेशन लोकसभा रणधुमाळीची नांदी ठरेल असे अनुमान

ड हे अधिवेशन विरोधी ऐक्याला चालना देणारे ठरणार असे मत

ड सरकार आणि विरोधकांची एकमेकांना घेरण्यासाठी पूर्ण तयारी

ड देशातील विविध प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यची तयारी